कोकणातील आपद्ग्रस्तांकरिता कायमस्वरूपी तोडगा - उदय सामंत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोकणातील आपद्ग्रस्तांकरिता कायमस्वरूपी तोडगा - उदय सामंत

रत्नागिरी : कोकणातील पाचही जिल्ह्यांकरिता कालबद्ध कार्यक्रमांअंतर्गत निधीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपद्ग्रस्तांना तात्पुरता दिलासा नव्हे तर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. पुढील चार वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात ही विकासकामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, आसामच्या धर्तीवर स्थलांतरितांसाठी निवारा केंद्र उभारण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यात १६ कोटी ८८ लाख, सिंधुदुर्गसाठी १७ कोटी ५२ लाख आणि अन्य जिल्ह्यांसाठी एकूण २०४ कोटी मंजूर झाले आहेत. समुद्रकिनारी भागात धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी रत्नागिरी ६९४ कोटी, सिंधुदुर्गसाठी ४०० कोटी असे एकूण १५९८ कोटी, भूमिगत वीजवाहिन्यांकरिता रत्नागिरीसाठी २०० कोटी आणि सिंधुदुर्गसाठी १०५७ कोटी असे एकूण १८२९ कोटी मंजूर केले आहेत. वादळाची पूर्वसूचना देण्यासाठी रत्नागिरी ८१ लाख, सिंधुदुर्गसाठी ३३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. वीज अटकाव यंत्रणेकरिता रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७७ लाख, सिंधुदुर्गसाठी १ कोटी ६७ लाख मिळणार आहेत. भूस्खलन उपायांकरिता ७१ लाख रुपये मिळणार आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत २००० कोटी व राज्याच्या अर्थ विभागातर्फे १७०० कोटी रुपये मिळणार आहेत, असे सामंत यांनी सांगितले.