सीईटी परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

सीईटी परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर

पुणे : बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झाला असून, अनेक विद्यार्थ्यांंनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी)अर्ज केला आहे. मात्र, अद्याप सीईटीच्या तारखा जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, पुढील तीन ते चार दिवसात सीईटीच्या तारखा प्रसिद्ध होतील, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले.

पुण्यातील अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांंशी उदय सामंत यांनी संवाद साधला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. सीईटी परीक्षांसाठी  राज्यातील पूर्वीची १९३ परीक्षा केंद्र ३५० पर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी काही कालावधी जात आहे. त्यामुळे या पूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंदाजित तारखांमध्ये बदल करावा लागला, असे ते म्हणाले.

मार्गदर्शक उपलब्ध नसल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्रामध्ये पत्रकारिता विषयात विद्यार्थ्यांंना पीएच. डी. करता येत नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून देण्यात आले. मात्र, अद्याप यावर कोणताही सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही. याबाबत उदय सामंत यांनाच पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर विद्यापीठाची चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

..तरच महाविद्यालये सुरू

करोना परिस्थितीत सुधारणा झाली तर महाविद्यालये सुरू करण्यास कोणतीही हरकत नाही. परंतु, करोनाची तिसरी लाट येताना दिसत असेल तर महाविद्यालये सुरू करणे धाडसाचे होईल. त्यामुळे ‘टास्क फोर्स’कडून देण्यात येणाऱ्या सूचनेनुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी नमूद केले.