तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं

दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेलं ‘तौते’ चक्रीवादळ अधिक सक्रिय झालं असून, गुजरातच्या दिशेनं सरकत आहे. त्यामुळे सर्वच यत्रंणा सर्तक झाली आहे. या वादळाचा तडाखा गुजरातसह महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेनं सरकण्यास सुरूवात झाली असून, येत्या काही तासांत कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील उवर्रित भागातही याचा परिणाम दिसून येणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे दिसून येत होते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ते समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ असेल. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांना सर्तक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील एनडीआरएफची पथकं गोव्याला रवाना झाली आहे. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.