भाजपचे जातीय कार्ड

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भाजपचे जातीय कार्ड

भाजपने कर्नाटकचा नवा मुख्यमंत्रि निवडताना अखेर जातीय कार्ड खेळले, पण भाजपचाही त्याला नाईलाज आहे. काँग्रेस असो की इतर कोणताही पक्ष राजकारणातील जातीयवादापासून अलिप्त नाहि. त्याच पंक्तित भाजपही जाऊन बसला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी एकेकाळचे जनता दलाचे ज्येष्ठ नेते एस आर बोम्मई यांचे पुत्र आणि सध्याच्या कर्नाटक भाजपच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्रि बसवराज यांची निवड मावळते मुख्यमंत्रि येडीयुरप्पा यांच्या जागी करण्यात आली आहे. यात विशेष असा की, बसवराज हेही लिंगायत जातीचेच आहेत. शिवाय ते येडीयुरप्पा यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. त्यामुळे  मुख्यमंत्रि जरी बसवराज झाले असले तरी या सत्तांतरावर येडीयुरप्पा यांचीच छाप असल्याचे जाणवते. मंत्रिमंडळाची निवड करताना कदाचित येडीयुरप्पा यांचेच निर्णय चालतील, असेही समजायला जागा आहे. याचे एकमेव कारण म्हणजे येडीयुरप्पा यांचे लिंगायत जातीवर असलेली पकड. या जातीची लोकसंख्या राज्यात सतरा टक्के आहे आणि तब्बल शंभर मतदारसंघात हे मतदार निकाल ठरवू शकतात. त्यामुळे येडीयुरप्पा यांना हटवून भाजप श्रेष्ठींना केवळ मानसिक समाधान झाले असेल. पण खरी सत्ता मागच्या दाराने पुन्हा येडीयुरप्पा यांच्याच हाती आहे, याचे प्रत्यंतर काही दिवसांनी येईल. वडिल आणि मुलगा मुख्यमंत्रि झाल्याचे हे दुसरे उदाहरण. पहिले देवेगौडा यांचे. एच डी देवेगौडा यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले आणि नंतर त्यांचे चिरंजीव एच. डी कुमारस्वामी हे मुख्यमंत्रि झाले. त्यानंतर आता बसवराज मुख्यमंत्रि झाले आहेत. त्यापूर्वी एस आर बोम्मई हे मुख्यमंत्रि होते. त्यांच्याच काळात पक्षांतराचा खटला गाजला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला तो निकाल बोम्मई निकाल नावानेच प्रसिद्ध आहे. कर्नाटकात बसवराज यांना मुख्यमंत्रिपदी निवडून भाजप नेतृत्वाने सुरक्षित चाल खेळली आहे. लिंगायतांचा राग थंड करण्यासाठी त्यांच्याच समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्रिपद दिले आहे. त्यामुळे येडीयुरप्पा यांचे सत्तापद गेल्याने संतप्त झालेले लिंगायत आता पुन्हा भाजपसाठी काम करतील. शिवाय, बसवराज हे येडीयुरप्पा यांचे उजवे हात समजले जात. त्यामुळे निर्णयप्रक्रियेत येडीयुरप्पा यांचेच वर्चस्व राहिल. लिंगायत नाराज होऊन पक्षापासून दूर जाणार नाहित, याची काळजी मोदी आणि शहा जोडीने घेतली आहे. यालाच भाजपचे जातीय कार्ड असेही म्हणता येईल. मुळात भाजपचे सरकार हे आयाराम आणि गयारामांना घेऊन बनवले आहे. पण लिंगायत समाज भाजपच्या पाठिशी नेहमीच राहिला आहे. त्यामुळे आता त्या समाजात आपली फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे लिंगायतांचा राग दूर करण्यासाठी भाजपकडे दुसरा पर्यायही नव्हता. परंतु येडीयुरप्पा यांच्या मनमानी कारभाराला इतर आमदार आणि नेते कंटाळले होते. भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीचे राजकारण रंगले होते. अनेक आमदारांनी नेतृत्वाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे नाईलाजाने नेत़ृत्वाने  येडीयुरप्पा यांनाच बदलण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळेस लिंगायत समाजाची नाराजीही ओढवून घ्यायची नव्हती. आता बसवराज यांना प्रथम काम करावे लागेल ते बंडखोरांना शांत करण्याचे. लिंगायतच नव्हे तर इतरही आमदार आणि नेत्यांची नाराजी दूर करावी लागेल. निवडणुकीसाठी अजून दोन वर्षांचा अवकाश आहे. तोपर्यंत पक्षाची मजबूत बांधणी करता येईल. कर्नाटकमध्ये प्रस्थापित विरोधी लाट येणार नाहि, याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. कोविडचा प्रश्न येडीयुरप्पा यांनी नीट हाताळला नाहि, असा त्यांच्यावर नेहमीच आरोप केला जातो. जनतेत त्याविरोधात असंतोषही होता. ते आता कमी झाला असेल. परंतु राज्यात इतरही अनेक समस्या आहेत. त्याकडेही लक्ष द्यावे लागेल. मात्र काँग्रेस आता जे मनाचे मांडे खात आहे की येडीयुरप्पा यांच्या पदावरून दूर होण्यामुळ लिंगायत समाज काँग्रेसकडे परत येईल, त्यात काही अर्थ नाहि. लिंगायत समाज कायम भाजपबरोबरच रहाण्याची शक्यता आहे. कारण वीरेंद्र पाटील यांच्या बाबतीत लिंगायत समाज पोळलेला आहे. भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरीही दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने लिंगायत भाजपकडेच रहातील. भाजपने लिंगायत समाजाचे वर्चस्व पाहूनच बसवराज यांना मुख्यमंत्रि केले आहे. मग मुळात येडीयुरप्पा यांना बदलण्याची गरजच काय होती, असा प्रश्न पडतो. पण एक तर भाजपला नवीन टीम तयार करायची आहे आणि त्यात तरूण नेत्यांना स्थान द्यायचे आहे. बसवराज हे आज एकसष्ट वर्षांचे आहेत. तर येडीयुरप्पा हे सत्त्याहत्तर वर्षांचे होते. नवीन तरूण चेहरे द्यायचे आणि त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीबद्दल काही माहित नसणे हे भाजपला लाभदायक ठरणारे आहे.  नेत्याचा इतिहास फारसा वादग्रस्त नसेल तर विरोधक तरी काय हल्ले चढवणार, हा मुद्दा आहे.  बसवराज यांच्याबद्दल फारसे कुणाला काही माहित नाहि. त्यामुळे त्यांच्यावर होणारी टिका फारच सौम्य असेल. हा लाभ निवडणुकीत होईल. बसवराज यांना इतर आमदार साथ देतील, यात काही शंका नाहि. भाजपने जातीय कार्ड खेळले खरे, पण ते भाजपला पथ्यावर पडणार आहे. आणि ही जातीय कार्ड खेळण्याची प्रथा तर काँग्रेसनेच आणली आहे. पंजाबात सिद्धून यांना काँग्रेसला प्रदेशाध्यक्षपदी आणावे लागले, पण आता एक दलित आणि एक हिंदू उपमुख्यमंत्रि काँग्रेसला करावा लागणार आहे. त्यामुळेच सत्तेचा समतोल साधला जाईल. म्हणून काँग्रेस आता भाजपवर जातीय कार्ड खेळल्याचा आरोप करू शकणार नाहि. शिवाय बसवराज हे माजी मुख्यमंत्रि बोम्मई यांचे चिरंजीव असले तरीही त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होणार नाहि. कारण बोम्मई हे जनता दलाचे होते. कर्नाटकात  भाजपने नवीन राज्य तर सुरू केले आहे. पण ही चाल यशस्वी होते की नाहि, हे काळच ठरवेल.