अफगाणच्या Mi-24 लढाऊ हेलिकॉप्टरवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अफगाणच्या Mi-24 लढाऊ हेलिकॉप्टरवर कब्जा केल्याचा तालिबानचा दावा

काबुल : तालिबानकडून गेल्या काही दिवसात अफगाणिस्तानच्या विविध शहरांसह महत्वाच्या स्थानांवर कब्जा करण्याचे सत्र सुरूच आहे. आता यात भारताने अफगाणिस्तानला भेट दिलेल्या Mi-24 या लढाऊ हेलिकॉप्टरचाही समावेश झाला आहे. तालिबानने या हेलिकाॅप्टरवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानमधील कांडुजमधून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे हेलिकॉप्टर तालिबानी लढाऊ हेलिकॉप्टरच्या ताफ्यात उभे असल्याचे दिसत आहे. या हेलिकॉप्टरचे रोटर ब्लेडही गायब आहेत. हे ब्लेड तालिबानने हेलिकॉप्टरचा वापर हल्ला करण्यासाठी वापरू नये, यासाठी पूर्वीच अफगाणिस्तानच्या सैन्याने काढून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारताने अफगाणिस्तानच्या हवाई दलाला २०१९ मध्ये तीन चित्ता हेलिकॉप्टर्ससह Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर भेट दिले होते. Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर २०१५ मध्ये अफगाणिस्तानला भेट देण्यात आलेल्या चार लढाऊ हेलिकॉप्टरच्या बदल्यात देण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने सद्यस्थितीत अफगाणिस्तानच्या सुमारे ६५ टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान गुरुवारी तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानातील प्रांतीय राजधानीतील पोलीस मुख्यालय ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. राजधानी काबुलपासून १५० किलोमीटरवर असलेल्या गजनी शहरावरही तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगानिस्तानमधून अमेरिकन आणि नाटो सैनिक हटवल्यानंतर या भागात दिवसेंदिवस तालिबान्यांचे वर्चस्व वाढत आहे. त्यामुळे अफगानिस्तानमधून लोक पलायन करत आहेत. भारतीय नागरिकही अफगाणिस्तानात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. मात्र तालिबानच्या वाढत्या कारवायांमुळे भारतानेही आपल्या नागरिकांना माघारी येण्याचे निर्देश दिले असून त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू झाली आहे.