‘डीआरडीओ’च्या करोनाप्रतिबंधक औषधाला मान्यता

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

‘डीआरडीओ’च्या करोनाप्रतिबंधक औषधाला मान्यता

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या  ‘2 डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (-डीजी) या कोविड-19 प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. हे औषध करोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल. ते तोंडावाटे घ्यावयाचे आहे.

2 डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (2-डीजी) हे औषध रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे अवलंबित्व कमी करत असल्याचे  नैदानिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

देश करोना महासाथीच्या लाटेशी झुंजत असताना आणि यामुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडला असताना या औषधाला मंजुरी मिळालेली आहे.

कोविड-19 च्या सध्याच्या दुसऱ्या लाटेत फार मोठ्या संख्येतील रुग्ण प्राणवायूवर अवलंबून असून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे. संसर्ग झालेल्या पेशींमध्ये हे औषध ज्या रीतीने कार्य करते, त्यामुळे ते अनेक मौल्यवान जीव वाचवण्याची अपेक्षा आहे. या औषधामुळे करोना रुग्णांचा रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधीही कमी होईल’, असे मंत्रालयाने नमूद केले.

करोनाविरुद्ध सहायक उपचार पद्धती म्हणून वापरासाठी 2-डीजी हे औषध डीआरडीओतील आघाडीची प्रयोगशाळा असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (इन्मास)ने हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने विकसित केले असल्याचीही माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. सहायक उपचारपद्धती (ॅडजंक्टिव्ह थेरपी) ही प्राथमिक उपचारांना मदत म्हणून वापरली जाते.

करोना महासाथीच्या विरुद्ध तयारी करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षाच्या सुरुवातीला केले होते, त्यानंतर डीआरडीओने या प्रकल्पावर काम सुरू केले असे  संरक्षण मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

विषाणूवाढीला प्रतिबंध कसा होतो?

-डीजी हे औषध पावडरच्या स्वरूपात येते. ते पाण्यात मिसळून घेतले जाते. विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये ते जमा होते आणि विषाणूजन्य संश्लेषण ऊर्जेचे उत्पादन थांबवून ते विषाणूची वाढीला प्रतिबंध करते. नेमक्या विषाणू संसर्गित पेशींमध्ये जमा होणे हे या औषधाचे वैशिष्ट्य आहे. या औषधाचे सहजरीत्या उत्पादन करता येऊन ते देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध केले जाऊ शकते, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

अतिरिक्त प्राणवायूवरील अवलंबित्व कमी

2-डीजी औषधाने उपचार करण्यात आलेल्या रुग्णांच्या लक्षणांमध्ये विविध निकषांवर नियमित उपचारांपेक्षा अधिक वेगाने सुधारणा दिसून आली. रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे अवलंबित्व कमी करत असल्याचे या औषधाच्या नैदानिक चाचण्यांत आढळून आले आहे. या औषधासह उपचार करण्यात आलेल्या कोविड रुग्णांमध्ये आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येण्याचे अधिक होते, याचाही मंत्रालयाने उल्लेख केला आहे.