होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती

मुंबईहोम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिलीराज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी सांगितलं.

ग्लोबल टेंडरला प्रतिसाद नाही

लसीकरणासाठी राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढले होते. त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं सांगतानाच  केंद्र  सरकारने  लसी आयात  कराव्यात आणि राज्यांना पुरवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. 18 ते 44 वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्याची जबाबदारी राज्याची आहे. त्यासाठी लागणाऱ्या लसीचे पैसे द्यायलाही राज्य तयार आहे, असंही ते म्हणाले.

म्युकर मायकोसिसवर खासगीत रुग्णालयातही मोफत उपचार?

राज्यात म्युकर मायकोसिसचे 2245 रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने त्याला नोटीफाईड आजार घोषित केलं आहे. रुग्ण आणि त्याबाबतची माहिती शासनाला देणं रुग्णालयांना बंधनकारक आहे. या आजारासाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसीन औषधाचं नियंत्रण केंद्राकडे आहे. केंद्र सरकारने औषध दिल्यावर आपण त्याचे प्रत्येक जिल्ह्यात वाटप करतो. त्यामुळे रुग्णांची माहिती देण्याच्या सूचना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच या आजारावर मोफत उपचार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच या आजारावरील उपचारासाठी 130 रुग्णालये निश्चित करण्यात आले आहेत. तसेच सध्या 2200 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येत आहेत, असं त्यांनी सांगितलं. खासगी रुग्णालयातही या आजारावर मोफत उपचार व्हावेत किंवा शासनाने ठरवलेल्या दरात उपचार व्हावेत म्हणून प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

त्या पैशातून जनजागृती

म्युकर मायकोसिसबाबत आम्ही जागरुक आहोत. रुग्ण वाढू नये, त्याचा प्रसार होऊ नये म्हणून खबरदारी घेत आहोत. मास्क वापरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. या पैशातून म्युकर मायकोसिसची जनजागृती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.