जरंडेश्वरप्रमाणे इतर कारखान्यांची चौकशी करा; गृहमंत्री अमित शहांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पत्र

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

जरंडेश्वरप्रमाणे इतर कारखान्यांची चौकशी करा; गृहमंत्री अमित शहांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे पत्र

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या गैरव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले त्याच पद्धतीने कारवाई होण्यासाठी ३० साखर कारखान्यांची यादी पत्रासोबत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवली.

पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, सक्त वसुली संचालनालयाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्यामुळे राज्यातील कायदा पाळणाऱ्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सहकारी बँकेमार्फत साखर कारखाने संचालकांच्या नातेवाइकांना कवडीमोल किमतीला विकले गेले. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना २२ ऑगस्ट २०१९ रोजी आर्थिक गुन्हे शाखेला पाच दिवसांत एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता.

आर्थिक गुन्हे शाखेने राजकीय दबावामुळे अजित पवार, जयंत पाटील अशा नेत्यांचा सहभाग असलेल्या या प्रकरणाबाबत ७२,००० पानांचा तपास बंद करण्याचा अहवाल सादर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारण्यापूर्वीच ईडीने जरंडेश्वर जप्तीची कारवाई केली.

इतर ४२ कारखान्यांवर कारवाई करा : शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी एका जरंडेश्वरवर कारवाई का, इतर ४२ कारखान्यांचे विक्री व्यवहार ईडी का तपासत नाही, असा सवाल केला. विशेष म्हणजे तोट्यात गेलेले, बंद पडलेले, जप्त केलेले हे सहकारी साखर कारखाने ज्या नेत्यांनी खरेदी केले होते, त्यात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश आहे.