दिल्लीच्या शाळांमध्ये आता अभ्यासक्रमात ‘देशभक्ती’चा समावेश; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

दिल्लीच्या शाळांमध्ये आता अभ्यासक्रमात ‘देशभक्ती’चा समावेश; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची घोषणा

देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनी दिल्ली सचिवालयात आयोजित कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या दरम्यान, केजरीवाल यांनी १९४७ पासून आजपर्यंत देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखणाऱ्या आणि सीमेवर बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांनाही श्रद्धांजली वाहिली. २७ सप्टेंबरपासून शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीच्या सर्व सरकारी शाळांमध्ये देशभक्तीपर अभ्यासक्रम सुरु केला जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मुख्यमंत्र्यांनी गेल्या पाच वर्षात दिल्लीत शिक्षणावर केलेल्या कामांबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी अनेक नवीन घोषणाही केल्या. या दरम्यान, केजरीवाल यांनी महान स्वातंत्र्य सेनानी शहीद भगतसिंग यांना श्रद्धांजली म्हणून २७ सप्टेंबरपासून दिल्लीच्या शाळांमध्ये ‘देशभक्तीपर अभ्यासक्रम’ सुरू करण्याची घोषणा केली.

“प्रत्येक मुलामध्ये अभिमानाची भावना निर्माण करणे आणि त्यांना राष्ट्रासाठी सर्वस्व देण्यास तयार करणे हा उद्देश आहे. आपला अभ्यासक्रम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र शिकवतो, पण देशभक्ती नाही. हा ‘देशभक्तीपर अभ्यासक्रम’ आपल्या मुलांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करेल,” असे केजरीवाल यांनी म्हटलं.

स्वातंत्र्यदिनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी आता ७० पदकांची तयारी करण्याची गरज आहे असे म्हटले. २०४७ नंतर ऑलिम्पिक आयोजित करण्यासाठी तयारी करायची असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले.