ज्योतिरादित्य शिंदे यांना मिळालं ३० वर्षांपूर्वी वडिलांनी सांभाळलेलं खातं

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ज्योतिरादित्य शिंदे यांना मिळालं ३० वर्षांपूर्वी वडिलांनी सांभाळलेलं खातं

बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी ( जुलै) पार पडला. तब्बल ४३ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर १२ जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना संधी देण्यात आली असून, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचीही वर्णी लागली आहे. शपथविधी पार पडल्यानंतर खातेवाटप करण्यात आलं यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. यात योगायोग असा की ३० वर्षांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांनी नागरी उड्डाण मंत्री म्हणून काम केलं होतं. त्यामुळे वडिलांनी सांभाळलेलं खातंच मुलाकडे आल्याची चर्चा सुरू आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच सरकार कोसळलं होतं. तर शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचं सरकार पुन्हा सत्तेत आलं होतं. या राजकीय भूकंपानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आलं आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्याकडे कोणतं खातं दिलं जाणार याची सगळी चर्चा सुरू होती. शपथविधीनंतर खातेवाटप करण्यात आलं. यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी हरदीप सिंह पुरी यांच्याकडे हे खातं होतं. शिंदे यांच्याकडे नागरी उड्डाण मंत्रालय आल्यानंतर इतिहासाला उजाळा मिळाला.