संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

सांगली : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या अभ्यासक, संशोधक, लेखिका तथा ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या सहचारिणी डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर गुरुवारी कासेगाव (जि. सांगली) येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. गेल यांना लॉकडाऊननंतर हळूहळू चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. पाटणकर यांच्या देखरेखेखाली वैद्यकीय उपचार घेत होत्या. त्यांची मुलगी प्राची, जावई तेजस्वी, नात निया हे सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून ते तेथे वेगवेगळ्या चळवळीत सहभागी असतात.
विविध घटकांसाठी केले मोठे कार्य
डॉ. ऑम्व्हेट श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, धोरण समितीच्या सदस्याही होत्या. त्यांनी वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणली. तसेच स्त्री मुक्ती, परित्यक्ता स्त्रिया, आदिवासी चळवळीमध्ये मोठे सामाजिक कार्य त्यांनी केले आहे.
सामाजिक कार्याची व्याप्ती
डॉ. गेल या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या असल्या तरी त्या तेथे विद्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. अमेरिकेच्या साम्राज्यवादी युद्धखोर प्रवृत्तीविरोधी उभा राहिलेल्या तरुणाईच्या चळवळीत त्या अग्रस्थानी होत्या. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या, वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षात सक्रीय सहभाग घेतला. पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राम्हीण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर करून त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांच्या आधी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही इतका सविस्तर अभ्यास करून, महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. इतकेच नव्हे या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत कांशीराम कासेगाव येथे येऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत. डॉ. गेल या अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. स्री-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांतीविरांगना इंदूताई पाटणकर यांची भेट झाली आणि एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करण्याचा निर्णय घेतलेल्या डॉ. भारत पाटणकर यांना आपला जीवनसाथी म्हणून निवड केली. प्रगत राष्ट्राचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले. डॉ. गेल आणि डॉ. भारत यांनी आपल्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री जोतिबांचा वारसा पुढे नेत पुढच्या पिढीसाठी एक नवा आदर्श घालून दिला.
विविध संस्थांमध्ये भूषवलेली पदे
डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले-आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वासमध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे. एफएओ, युएनडीपी, एनओव्हीआयबीच्या सल्लागार राहिल्या आहेत. आयसीएसएसआरच्या वतीने भक्ती या विषयावर संशोधन केले आहे.

वृत्तपत्र, पुस्तकांतून केलेले लिखाण
दी इकॉनॉमिक अँड पोलिटिकल विकली या प्रतिष्ठित अंकामध्ये व द हिंदू या देशभरात जात असलेल्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत. द हिंदू यामधील लेख वाचून विरप्पन यांनी सुद्धा पत्र पाठवून कौतुक केले आहे. याशिवाय २५ पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित केली असून त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी-द नॉन ब्राम्हीण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे. डॉ. गेल यांनी देश आणि परदेशात अनेक संशोधन पेपर सादर केले असून शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत.