भाजपचे नारायणास्त्र

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भाजपचे नारायणास्त्र

भाजप खासदार नारायण राणे यांना दिल्लीला अचानक पाचारण करण्यात आले आहे. सध्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे आणि बदलाच्या चर्चा दिल्लीत जोरात सुरू आहेत. तसे तर पंतप्रधान मोदींना काही महिन्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करायचा होता. तेव्हाही या चर्चा जोरात रंगल्या होत्या. परंतु अचानक कोरोनाची दुसरी लाट आली आणि देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करणे औचित्याला धरून नव्हते. म्हणून आता कोरोनाच्या रूग्णांची संख्या कमी होत आहे आणि लाटही काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालट नक्की होणार, असे समजते. मात्र यावेळी एक नाव नवीन आहे आणि ते अर्थातच माजी मुख्यमंत्रि नारायण राणे यांचे आहे. राणे यांना यंदा केंद्रिय मंत्रिपद दिले जाणार, हे बहुधा नक्की मानले जाते. त्यांना शिवसेनेकडे वंशपरंपरागत चालत आलेले अवजड उद्योग खातेच दिले जाण्याची शक्यता आहे. तसे या खात्याचे नाव मोठे असले तरीही प्रत्यक्षात या खात्याला फारसे महत्व नसले तरीही त्याद्वारे राणे यांचा केंद्रिय मंत्रिमंडळात प्रवेश होणे खूप महत्वाचे आहे. राणे हे भाजपच्या दृष्टिने शिवसेनेला शह देण्यासाठी एक महत्वाचे नेते आहेत. राणे यांचे राजकीय महत्व राज्यात नसले तरीही दिल्लीत खूप आहे. केंद्रिय गृहमंत्रि अमित शहा सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या रूग्णालयाच्या उद्घाटनाला आले तेव्हा त्यांनी राणे यांच्या प्रशासनाची आणि कामाची खूप प्रशंसा केली होती. ती उगीचच नव्हती. तर प्रत्यक्षात शहा त्यांच्या नियोजनामुळे प्रभावित झाल्याचे दिसत होते. नाहि तर पाहुण्याच्या घरी जातो तेव्हा त्याच्याबद्दल चार चांगले कौतुकाचे शब्द बोलण्याची प्रथाच आहे. राणे यांना केंद्रिय मंत्रिपद दिल्यास त्याचा भाजपला अनेक अर्थानी फायदा होणार आहे. एक तर शिवसेनेला थेट अंगावर घेणारे भाजपमध्ये जे नेते  आहेत त्या फडणवीस, दरेकर, शेलार आणि अतुल भातखळकर यांच्या रांगेत राणेंसारखा तगडा नेताही आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिले तर ते कोकणात शिवसेनेचा वारू रोखू शकतात. कोकणात राणेंचा भरपूर प्रभाव आहे. खुद्द बाळासाहेबांबरोबर काम केले असल्याने त्यांना शिवसेनेच्या कार्यशैलीची चांगलीच माहिती आहे. किंबहुना तेही या कार्यशैलीचे एक जनक होते. त्यामुळे शिवसेनेला राणेंच्या रूपाने शह देणारा एक जबरदस्त नेता भाजपला मिळाला आहे, असे भाजपला वाटत आहे. पुढील वर्षी मुंबई पालिका निवडणुका आहेत. शिवसेनेच्या हातून पालिका खेचून घेण्याचा चंग भाजपने बांधला असून यात राणेंचे मंत्रिपद लाभदायक ठरू शकते. पण राणेंना मंत्रिपद देण्यामागे मोठा हेतू हा आहे की त्यामुळे आरक्षणामुळे नाराज झालेल्या मराठा समाजास शांत करण्याचा हा एक मार्ग असू शकतो. मराठा आरक्षणात राणे यांनीच महत्वाची भूमिका बजावली, हे कुणीच नाकारू शकणार नाहि. मात्र त्यांनी ज्या मुद्यांवर आरक्षण सुचवले होते, ते मात्र न्यायालयात मानले गेले नाहित. राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे मराठा समाज शांत होणार नसला तरीही त्याच्या संतापाची धार काहीशी कमी होऊ शकते. आता मराठा आरक्षणाचा निर्णय हा केंद्रिय पातळीवरच होणार आहे. त्यामुळे तशी वेळ आलीच तर राणे महत्वाची भूमिका बजावू शकतात. शिवसेनेचे बलस्थान कोकण आहे तसेच ते राणेंचेही आहे. मुळात राणे आणि त्यांच्यासारख्या काही नेत्यांमुळेच शिवसेना कोकणात फैलावली. राणेंनी साम, दाम, दंड,भेद वापरून कोकणात शिवसेनेला पक्के रोवले. त्यामुळे जे राणेंचे अनुयायी आहेत, ते आता राणेंबरोबरच रहातील.कारण नेत्याकडे सत्तापद नसेल तर अनुयायी आणि समर्थक टिकत नाहित. भाजपला पश्चिम बंगालमध्ये जास्त जागा मिळाल्या नाहित, म्हणून पुन्हा तृणमूल काँग्रेसकडे घरवापसीची जी लाट आली आहे,त्यावरून हेच सिद्ध होते. नेते आणि पक्ष तसेच कार्यकर्ते सारेच व्यावसायिक झाले आहेत. राणे मंत्रि असतील किंवा त्यांच्याकडून काहीतरी पदरात पडण्याची काही आशा असेल तरच कार्यकर्ते त्यांच्याकडे टिकतील हे सर्वांच्याच बाबतीत खरे आहे. याला कोणताही नेता अपवाद नाहि. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे इतका आटापिटा करून हे सरकार टिकवण्याची धडपड का करत आहेत, यामागे हेच कारण आहे. कारण सत्ता नसेल तर राष्ट्रवादीचे नेते एक दिवसही पक्षात थांबणार नाहित. पवाराना हे चांगले माहित आहे. हीच गत प्रत्येक पक्षाची असते. अपवाद फक्त भाजप आणि डावे पक्ष. मूळचे डावे किंवा भाजपचे अनुयायी कधीच पक्ष सोडत नाहित. राणे यांना या निमित्ताने स्वतःचे राजकारण प्रभावी करण्याची मोठी संधी आली आहे. राणे राजकारणातून संपले, वगैरे चर्चा करणारे तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. तसे तर कोणताही पक्ष किंवा नेता कायमचा संपत नसतो. चढउतार मात्र येत  असतात. मात्र राणे यांना जर केंद्रात मंत्रिपद मिळालेच तर त्यांना आपली आक्रमक शैली बदलावी लागेल. ते मूळचे शिवसेनेचे असल्याने शिवसेनेत एकेकाळी असलेली आक्रमकता त्यांच्यात पूर्णपणे उतरली आहे. तिला त्यांना आता मुरड घालावी लागेल. कारण दिल्लीत आक्रमक भाषा आणि आक्रमक वर्तन दोन्ही स्विकारले जात नाहि. दरबारी शैली तेथे आपलीसी करून घ्यावी लागते. राणे यांना याबाबतीत संयमी दृष्टिकोन ठेवावा लागेल. एक गोष्ट येथे स्पष्ट केली पाहिजे. राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आणि म्हणून त्यांना दिल्लीला बोलवले आहे, या बातम्या आहेत. अद्याप याबाबत काहीही अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाहि. परंतु सर्वच प्रसारमाध्यमे बातम्या देतात, तेव्हा त्यात काहीतरी तथ्याचा अंश असतोच.