कश्मिरातील भारतविरोधाचे युग संपले

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कश्मिरातील भारतविरोधाचे युग संपले

कश्मिरमधील पाकिस्तानवादी नेते आणि हुर्रियत परिषदेच्या संस्थापकांपैकी एक सय्यद अली शाह गिलानी यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने कश्मिर खोर्यातील भारतविरोधी राजकारणाचे एक युग समाप्त झाले. गिलानी कट्टरवादी फुटिरतावादी नेते होते आणि त्यांच्या निधनाने फुटिरतावादी राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. मात्र गिलानी यांच्या निधनाने भारताचा फायदाच झाला आहे. तालिबानचे अफगाणिस्तानात सत्तेवर येणे आणि त्याचवेळी पाकिस्तानने तालिबानला कश्मिरात कारवाया करण्यासाठी उद्युक्त करण्याचा डाव रचणे या पार्श्वभूमीवर गिलानी यांचे निधन होणे हा एक विचित्र योगायोग आहे. सय्यद अलि शाह गिलानी यांच्या निधनावर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरून पाकिस्तान आणि गिलानी यांचे किती जिव्हाळ्याचे संबंध होते, ते स्पष्टच होते. इम्रान खान यांनी गिलानी यांना ते पाकिस्तानी होते,  असे सांगत पाकिस्तानी राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. गिलानी यांनी आयुष्यभर पाकिस्तानची तळी उचलून धरली आणि भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम करण्याचे कारस्थान केले. हुर्रियतमध्ये दोन गट होते. मीरवाईज उमर फारूख यांचा गट मवाळ असून कश्मिरने तटस्थ रहावे, ही त्यांची विचारधारा आहे. तर गिलानी यांची विचारधारा सरळ सरळ कश्मिरला पाकिस्तानमध्ये सामिल करून टाकावे, अशी होती. अर्थात इतक्या फुटिरतावादी नेत्याला पोसण्याचे काम भारतात जर कुणी केले असेल तर काँग्रेसने. आता पुरोगामी पत्रकारांना गिलानी यांच्या निधनाचे कढ येतील  आणि सारे काही आंतरराष्ट्रीय राजकारण आपल्यालाच कळते, असे जे पत्रपंडित समजतात ते गिलानी यांचे गोडवे गायला सुरूवात करतील. हुर्रियत नेत्यांचे लाड-त्यात गिलानीही आले-केले ते मनमोहन सरकारने. हे सरकार या हुर्रियत नेत्यांना दिल्लीला चर्चेसाठी बोलवत आणि त्यांची बडदास्त एखाद्या राष्ट्रप्रमुखासारखी ठेवली जाई. नंतर हेच हुर्रियत नेते कश्मिरात जाऊन भारतविरोधी गरळ ओकत. भारताविरोधात वातावरण तयार करण्यात हुर्रियतच्या गिलानी गटाचा फार मोठा हात आहे. गिलानी हे इतके कडवे भारतविरोधी होते की भारत विरोधातील खोर्यातील संतापाचे ते प्रतिक बनले होते. अर्थात त्यांना पूर्ण पाठिंबा असा कधीच मिळाला नाहि. भारताचे कश्मिरमधील अस्तित्वच ज्या नेत्याला सहन होत नव्हते, त्या नेत्याचे जवळपास सर्व आयुष्य तुरूंगात किंवा  स्थानबद्धतेत जावे, हे अपरिहार्यच आहे. गिलानी यांच्या अंत्ययात्रेत लोक मोठ्या प्रमाणावर सामिल झाले, तर हिंसाचार होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना असल्यानेच सरकारने खोर्यात संचारबंदी लागू केली असून इंटरनेट सेवा बंद केली आहे. कश्मिरमध्ये हिंसाचार भडकण्यासाठी साधे कारणही पुरते. येथे तर गिलानी यांचे निधन झाले आहे. त्यामुळे केंद्राने कश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे. आता यावरही पाकिस्तानवादी गळे काढतील. गिलानी हे कश्मिरचे पाकिस्तानात विलीनीकरण व्हावे, या ठाम मताचे होते आणि त्याबाबतीत  त्यांनी कधीही तडजोड केली नाहि. पण त्यांनी कश्मिरात निरपराध नागरिकांची अतिरेकी कत्तल करत असताना त्यांच्या निषेधाचा सूरही काढला नाहि. गिलानी यांच्या  फुटिरतावादी धोरणाबद्दल त्यांच्यावर कठोर टिका करण्यात आली. भारताबाबत त्यांची भूमिका पूर्णपणे चुकीची होती. भारत जोपर्यंत कश्मिरला वादग्रस्त प्रदेश म्हणून जाहिर करत नाहि आणि जमाते इस्लामी कार्यकर्त्यांची तुरूंगातून सुटका करत नाहि, तोपर्यंत भारत सरकारशी चर्चा करायची नाहि, ही त्यांची भूमिका होती. गिलानी हे शेवटपर्यंत पाकिस्तानचे डार्लिंग राहिले, यात काहीच नवल नाहि. पण भारताने त्यांना इतकी भारतविरोधी भूमिका घेऊनही सन्मानाने वागवले. याला दोन कारणे होती. एक तर हिंसाचार जेव्हा सर्वोच्च पातळीवर पोहचला होता, तेव्हा गिलानी यांचा गट चर्चेसाठी तयार होता. भारताचे राजकीय नेते आणि सत्ताधारी तेव्हा कश्मिरातील कोणत्याही गटाशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे उठल्या बसल्या  सांगत असत. दुसरे असे की, काँग्रेसला आपली अल्पसंख्यांक मत बँक टिकवण्यासाठी हुर्रियत गटाशी चर्चा करणे सहाय्यकारी होत असे. या चर्चेचा उपयोग काहीही होत नसे. पण दिल्लीतील सत्ताधारी आणि हुर्रियत या दोघांनाही आपण चर्चेत गुंतलो आहोत, हे दाखवून आंतरराष्ट्रीय समुदायाचे समाधान करता येत असे. गिलानी यांच्यात दोन गुण चांगले होते. एक तर कोणतीही चळवळ हिंसाचारी गटाच्या ताब्यात जाऊ देऊ नये, या मतावर ते ठाम होते. पण यासिन मलिकच्या जेकेएलएफने कश्मिरी पंडितांना नेसत्या वस्त्रानिशी पळवून लावले, तेव्हा त्यांनी एक शब्दही काढला नाहि. दुसरा गुण म्हणजे ते सहिष्णु होते. त्यांच्यावर कितीही टिका झाली तरीही ते शांतपणे ऐकून घेत. हा अपवाद सोडला तर फुटिरतावाजी नेत्याचा दुराग्रह त्यांच्याकडे भरपूर होता. गिलानी यांच्या निधनाने कश्मिरातील फुटिरतावादी राजकारणाचे युग संपले आहे. खोर्यातील कोणत्याही नेत्याकडे किंवा हुर्रियत गटाकडे फुटिरतावादी भूमिकेतून कश्मिरला हलवून सोडण्याची ताकद आज नाहि. गिलानी यांच्या निधनाने कश्मिरातील फुटिरतावादी चळवळीला दुसरा मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे तर सर्वात मोठे नुकसान झाले आहे. कारण पाकिस्तानने सर्वात जिव्हाळ्याचा मित्र गमावला आहे. गिलानी यांच्या निधनाने आता कश्मिरातील हुर्रियतचे युग संपले आहे.