स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधून जैशच्या ४ दहशतवाद्यांना अटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधून जैशच्या ४ दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीर पोलिसांनी शनिवारी चार दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली आहे. तसेच जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला. जैशचे मॉड्यूल स्वातंत्र्यदिनी हल्ला करण्याच्या तयारीत होते. ड्रोनद्वारे सोडण्यात आलेली शस्त्रात्रे गोळा करून ते काश्मीरमधील जैशच्या इतर दहशतवाद्यांना पोहोचवणार होते. तसेच ते १५ ऑगस्टपूर्वी जम्मूमध्ये आयईडी स्फोट करण्यासह देशातील काही महत्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याची योजना आखत होते.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील दहशतवाद्यांच्या ताब्यातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हा हल्ला करण्यासाठी मोटारसायकल आयईडीचा वापर करण्यात येणार होता. पोलिसांनी सर्वप्रथम पुलवामा येथील प्रचू परिसरातील मुंतझीर मंजूरला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल, एक मॅगझिन, आठ जिवंत राऊंड आणि दोन चिनी हँड ग्रेनेड जप्त करण्यात आले. काश्मीर खोऱ्यात शस्त्रे नेण्यासाठी वापरला जाणारा एक ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

मुंतझीर मंजूरच्या अटकेनंतर जैशचे आणखी तीन दहशतवादी पकडले गेले. चौकशीदरम्यान एका दहशतवाद्याने पोलिसांना सांगितले की, पाकिस्तानातील जैश कमांडर मुनाझीर उर्फ शाहिद याने त्याला पंजाबमध्ये ड्रोनद्वारे सोडण्यात आलेली शस्त्रास्त्रे गोळा करण्यास सांगितले होते. तसेच जैश कमांडरने त्याला पानिपत तेल रिफायनरीमध्ये रेकी करण्यास सांगितले होते. त्याने रिफायनरीचे व्हिडिओ पाकिस्तानमधील त्याच्या कमांडरला पाठवल्याची कबुली दिली आहे. हे काम झाल्यानंतर त्यानंतर त्याला अयोध्या रामजन्मभूमीचे सैनिकी दृष्टीने सर्वेक्षण करण्याचे काम देण्यात आले होते.