तौते चक्रीवादळाची सावधगिरी म्हणून राजापूर तालुक्यात वेळीच स्थलांतर

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तौते चक्रीवादळाची सावधगिरी म्हणून राजापूर तालुक्यात वेळीच स्थलांतर

रत्नागिरी : अबी समुद्रात आज झालेल्या तौते चक्रीवादळाची सावधगिरी म्हणून काही नागरिकांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांचे वेळीच स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे जीवितहानी टळली. कोणीही जखमीही झाले नाही.  जिल्ह्यात राजापूर तालुक्याला सर्वप्रथम तौते चक्रीवादळाने सलामी दिली. सकाळपासून जोरदार वारे आणि पाऊस सुरू होता. त्यामध्ये समुद्रकिनाऱ्यावरील काही घरांची किरकोळ पडझड होण्याव्यतिरिक्त कोणतेही नुकसान झाले नाही. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने किनाऱ्यावरील आंबोळगड, माडबन, सागवे, आवळीची वाडी येथील काही घरांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते. त्यात आवळीची वाडीतील ३५, आंबोळगड येथील ६८ कुटुंबांतील २५४, माडबनमधील २० घरांमधील ७८, सागवे येथील ६२ लोकांचा समावेश होता वादळाच्या पार्श्वभूमीवर काल तहसीलदार प्रतिभा वराळे आणि गटविकास अधिकारी सागर पाटील यांनी  किनाऱ्यावरील गावांमध्ये बैठका घेऊन लोकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. आपत्कालीन काळात नेमकी कोणती काळजी घ्यावी, याचे आवाहन केले होते. संभाव्य वादळाला सामोरे जाण्यासाठी योग्य नियोजन केले होते. त्याप्रमाणे ग्रामस्थही सतर्क झाले होते. आज सकाळपासून जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला होता. त्यानंतर ही स्थिती दिवसभर कायम होती. कशेळी, दांडे अणसुरे, दळे, मिठगवाणे, सागवे, गोठिवरे येथे घरांवर झाडे कोसळून घरांचे किरकोळ नुकसान झालेमात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. डोंगर तिठआ येथे रस्त्यामध्ये झाड कोसळून वाहतूक बंद झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने झाड तोडून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. वादळाच्या अनुषंगाने तहसीलदार प्रतिभा वराळे या सातत्याने त्या त्या भागातील प्रशासनासह लोकांच्या संपर्कात राहून वेळोवेळी सूचना देत होत्या. त्यामुळे मोठे नुकसान टाळायला मदत झाली.

 

(हिंदुस्थान समाचार)