ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला दिल्लीतून अटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला दिल्लीतून अटक

छत्रसाल स्टेडियममध्ये जूनियर गोल्ड मेडलिस्ट पैलवान सागर राना हत्या प्रकरणात मागील अनेक दिवसांपासून
फरार असलेला ऑलिंपिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार आणि त्याचा साथीदार अजयला दिल्ली पोलिसांनी
दिल्लीतील मुंदका परिसरातून अटक केली आहे. सुशीलवर पोलिसांनी एक लाख रुपये आणि अजयवर 50 हजार
रुपयांच्या इनामाची घोषणा केली होती. दरम्यान, मंगळवारी रोहिणी कोर्टाने सुशील कुमारचा जामीन अर्ज
फेटाळला होता.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी सांगितल्यानुसार, 5 मे रोजी छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये पैलवानांच्या दोन गटात हाणामारी
झाली होती. यात गोळीबारदेखील करण्यात आला होता. या हाणामारीत सागर (23), सोनू (37), अमित कुमार
(27) आणि इतर 2 पैलवान जखमी झाले होते. या हाणामारीत जखमी झालेल्या सागरचा हॉस्पिटलमध्ये
उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो दिल्ली पोलिसांतील हेड कॉन्स्टेबलचा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही
हाणामारी संपत्तीच्या वादातून झाली होती. सागर आणि त्याचे मित्र ज्या घरात राहत होते, ते घर रिकामे
करण्यासाठी सुशील कुमार दबाव टाकत होता.
पोलिसांना घटनास्थळावरुन 5 गाड्यांसह एक लोडेड डबल बॅरल गन आणि 3 जिवंत काडतूस सापडले. दरम्यान,
या प्रकरणात प्रसिद्ध पैलवान सुशील कुमारवर गंभीर आरोप असल्यामुळे दिल्ली पोलिस या प्रकरणाचा सखोल
तपास करत आहेत.घटनेच्या एका दिवसानंतर सुशील कुमारने आपली बाजू मांडली होती. त्याने म्हटले होते की,
हाणामारी झालेल्या पैलवानांची टोळी आमच्या ओळखीची नव्हती. त्यांची हाणामारी सुरू होती, तेव्हा आम्हीच
पोलिसांना सूचना दिली होती.