मुंबईत डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू, राज्यातील दुसरा बळी

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू, राज्यातील दुसरा बळी

मुंबई, १३ ऑगस्ट (हिं.स.) : कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी होत असतानाच डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका राज्यात वाढताना दिसत आहे. मुंबईत डेल्टा प्लसमुळे ६० वर्षीय महिलेचा पहिला बळी गेला आहे. ही महिला पूर्व उपनगरात राहणारी होती. विशेष म्हणजे या महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तरीही तिचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जूनमध्ये संगमेश्वरमधील महिलेचा झाला होता मृत्यू

डेल्टा प्लसचा हा राज्यातील दुसरा मृत्यू ठरला आहे. जूनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये डेल्टा प्लसने महिलेचा मृत्यू झाला होता. राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६४ वर पोहोचली आहे.

काय आहे पार्श्र्वभूमी

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेला मधुमेहासह अन्य आजारांमुळे गुंगागुंत वाढत जाऊन या महिलेचा मृत्यू झाला. मुंबईत बुधवारी डेल्टा प्लसचे ७ रुग्ण आढळले होते. त्यात या महिलेचा समावेश होता. या महिलेने कोरोनावरील लसचे दोन्ही डोस घेतले होते. या महिलेला कोरडा खोकला तसेच अंगदुखीचा त्रास होत होता. ही महिला फुप्फुसाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. तसेच कित्येक दिवसापासून अंथरुणाला खिळून होती. शिवाय चवही लागत नव्हती. त्यानंतर कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात महिलेवर उपचार सुरू होते. ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्यानंतर रेमडेसिवीर आणि स्टेरॉइड्स त्यांना देण्यात येत होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून डेल्टा प्लस विषाणूची लागण होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे जीनोम सीक्वेन्सिंगमध्ये स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या महिलेची २१ जुलै रोजी चाचणी करण्यात आली होती. २४ जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, २७ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. मात्र, पालिकेकडे बुधवारी ११ ऑगस्ट रोजी ती महिला रूग्ण डेल्टा प्लस पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तत्पूर्वी तिच्या मृत्यूची नोंद कोविड पॉझिटिव्ह अशीच करण्यात आली होती.

photo-delta

राज्यभरातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण
महाराष्ट्रात बुधवारी २० नवे डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले. यामध्ये मुंबईत सात, पुणे तीन, रायगड, पालघर, नांदेड, गोंदियात प्रत्येकी दोन, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्णांची संख्या ६४ वर पोहोचली आहे.