मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरु?; भारतीय विमान डोमिनिकात दाखल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरु?; भारतीय विमान डोमिनिकात दाखल

नवी दिल्ली  : भारतात १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा करुन फरार झालेल्या मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भारताने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी लागणारी कागदपत्रं डोमिनिकाला पाठवली आहेत. देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्याच्या वकिलांनी अँटिग्वामधून अपहरण करुन मेहुल चोक्सीला जबरदस्ती डोमिनिकामध्ये नेल्याचा दावा केला आहे. भारतातून फरार झाल्यानंतर २०१८ पासून मेहुल चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्यास होता.

एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआय आणि ईडीने फक्त केसशी संबंधित फाईल्स डोमिनिकाला पाठवल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालय मेहुल चोक्सी प्रकरणासंबंधी डोमिनिका आणि अँटिग्वाशी समन्वय साधत असून सीबीआय आणि ईडी केसशी संबंधित माहिती देण्यात मदत करत आहे.

दरम्यान भारताचं खासगी विमान डोमिनाकमध्ये २८ मे रोजी दाखल झाल्याच्या वृत्ताला अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी दुजोरा दिल्याचं वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. “माझ्या माहितीप्रमाणे भारत सरकारने मेहुल चोक्सी फरार असल्याचं सिद्ध करण्यासाठी तेथील कोर्टामधील कागदपत्रं पाठवली असून ही कागदपत्रं येथील पुढील सुनावणीत वापरण्यात येणार आहेत,” अशी माहिती अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी अँटिग्वा न्यूज रुमशी बोलताना दिली आहे. “मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे,” असंही ते म्हणाले आहेत. मेहुल चोक्सीने अँटिग्वामधून पळ काढून प्रत्यापर्ण प्रक्रिया सोपी केली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.  “मेहुल चोक्सी वैयक्तिक कारणामुळे डोमिनिकात पोहोचला आहे. यामध्ये तपास यंत्रणांची कोणतीही भूमिका नाही. भारतीय तपास यंत्रणांनी अपहरण केल्याचा त्याचा दावा निराधार आहे. डोमिनिकाने बेकायदेशीर देशात प्रवेश केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई केली असून यामुळे केसमध्ये बरीच मदत होणार आहे,” असं एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.