लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा द्या; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना बाहेर फिरण्याची मुभा द्या; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत

राज्यात करोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विशेषत: दुकानांच्या आणि पर्यटनाच्या बाबतीत ही मागणी केली जात आहे. मात्र रुग्णसंख्येत अपेक्षित घट झालेली नसून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आणि गर्दी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कायम राहतील, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना नागरिकांवरील निर्बंधाबाबत अजित पवारांनी मत मांडले.

“ज्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत अशा नागरिकांना टप्याटप्प्याने बाहेर फिरण्याची मुभा देण्याचा विचार आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे,” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 “काही जणांच म्हणणं आहे की इथून पुढं १०० ते १२० दिवस खूप म्हत्त्वाचे आहेत. या दिवसांमध्ये नागरिकांनी नियमावलीच तंतोतंत पालन करायला पाहिजे. परंतु, ग्रामीण भागात मास्क वापरत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. नागरिक विनामास्क असल्याचं चित्र आहे. एक बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकते त्यामुळे सर्वानी नियम पाळले पाहिजेत, असेही अजित पवार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना परिस्थितीवर आरोग्य विभागाच्या वतीने सादरीकरण करण्यात आले होते. राज्यातील बहुतांश भागांत करोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी १० जिल्ह्य़ांत रुग्णसंख्या जास्त आहे. गेल्या काही आठवडय़ांपासून राज्यातील करोना रुग्णांचा दैनंदिन आलेख हा ७ ते ८ हजारांच्या दरम्यान स्थिरावला आहे. पण तो ५ हजारांपेक्षा कमी होणे अपेक्षित असताना तसे होऊ शकलेले नाही, याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले होते. तसेच केंद्रीय पातळीवरून तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबत इशारा देण्यात आल्याकडेही लक्ष वेधण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्याची मागणी करण्यात आली असली तरी तूर्त ते कायम राहतील, असे संकेत देण्यात आले होते.