टोकियोमध्ये २ आठवड्यांची आणीबाणी लागू; प्रेक्षकांविना पार पडणार ऑलिम्पिक स्पर्धा?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

टोकियोमध्ये २ आठवड्यांची आणीबाणी लागू; प्रेक्षकांविना पार पडणार ऑलिम्पिक स्पर्धा?

जपानची राजधानी टोकियो येथे २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होणार आहेत. पण टोकियोमध्ये वाढत्या करोना संकटामुळे जपानी सरकार आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या संख्येचा विचार करता तज्ञांशी झालेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी पुढील सोमवार ते २२ ऑगस्ट दरम्यान जपानमध्ये आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर आता टोकियोमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

गेल्या वर्षी करोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. ऑलिम्पिक स्पर्धावरील करोना संकट लक्षात घेता जपान सरकार आणखी काही कठोर निर्णय घेऊ शकते. खेळांच्या दरम्यान परदेशी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळणार नाही.

यापूर्वी, टोकियोमधील नागरिकांना मैदानात जाऊन ऑलिम्पिक खेळ पाहणे शक्य आहे का हे तपासले जात होते. पण दोन आठवड्यांच्या आणीबाणीमुळे स्थानिक प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यताही दूर झाली आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी करोना विषाणूचा वाढत्या कहर लक्षात घेऊन टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आणीबाणीच्या परिस्थितीत ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाईल. त्यामुळे आता ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टोकियोमध्ये करोना संदर्भात खूप कठोर प्रोटोकॉल लागू करण्यात आलेले नाही. बार आणि रेस्टॉरंट्सचे तास कमी करुनही करोना संसर्ग थांबलेला नाही. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख गुरुवारी टोकियो येथे दाखल होणार आहेत. पण ते तीन दिवस टोकियोच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहणार आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जपानमधील ही चौथी आणीबाणी असेल. गेल्या आठवड्यात ७१४ बाधितांच्या च्या तुलनेत बुधवारी टोकियोमध्ये ९२० नवीन करोना बाधित आढळून आले आहेत. मे महिन्यानंतर एकाच दिवसात सापडलेल्या बाधितामध्ये ही सर्वात जास्त रुग्णसंख्या आहे.