.म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

.म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही

मुंबई, 6 जून : महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले. 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर गावसकरांनी 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एवढे मोठे खेळाडू असूनही त्यांनी कधीच टीम इंडियाचा (Team India) प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही. 90 च्या दशकात अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळली, यामध्ये संदीप पाटील (Sandeep Patil), अंशुमन गायकवाड (Anshuman Gaikwad), कपिल देव (Kapil Dev) यांच्या नावाचा समावेश आहे, पण आपण प्रशिक्षक का झालो नाही, याबाबत गावसकरांनी खुलासा केला आहे.

द एनालिस्ट या युट्युब चॅनलवर गावसकर बोलत होते. 'कोच म्हणून मी योग्य व्यक्ती नाही, कारण कोच किंवा सिलेक्टर होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक बॉल पाहावा लागतो. मी तुकड्या तुकड्यांमध्ये मॅच बघतो. जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतरही मी पूर्ण मॅच बघायचो नाही. थोडा वेळ मॅच बघितल्यानंतर मी पुस्तक वाचायला किंवा आलेल्या पत्रांना उत्तर देण्यासाठी जायचो. मी कधीही गुंडप्पा विश्वनाथ किंवा माझे मामा माधव मंत्री यांच्यासारखा मॅचचा प्रत्येक बॉल बघायचो नाही,' अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली.

गावसकर टीमचे प्रशिक्षक झाले नसले तरी त्यांनी खेळाडूंना उपयोगी असा सल्ला नेहमीच दिला. सध्या मात्र ते खेळाडूंना बॅटिंग टिप्स देताना दिसत नाहीत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly), राहुल द्रविड (Rahul Dravid) जेव्हा टीममध्ये होते, तेव्हा गावसकर त्यांना नेहमीच बॅटिंगबाबत काही गोष्टी सांगायचे. सचिन आणि द्रविड यांनीही अनेकवेळा याबाबत सांगितलं आहे.

 

फाफ डू प्लेसिस म्हणतोय, 'या'बाबतीत आयपीएलपेक्षा सरस आहे पीएसएल

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वोत्तम टी २० लीग मानली जाते. गेल्या काही वर्षांत बांगलादेश प्रीमियर लीग (बीपीएल), पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) आणि बिग बॅश लीग (बीबीएल) सारख्या वेगवेगळ्या क्रिकेट लीगला सुरुवात झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आयपीएलचा वेगळाच प्रभाव आहे. याच कारणास्तव जगभरातील क्रिकेटपटू आयपीएलला फ्रेंचायझी क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा म्हणतात. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसलाही असेच वाटते. परंतु, एका बाबतीत तो पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएलला आयपीएलपेक्षा चांगला मानतो.

याबाबतीत पीएसएल सरस
डू प्लेसिस आयपीएलमध्ये एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो तर, पीएसएलमध्ये तो क्वेटा ग्लेडिएटर्सशी संबंधित आहे. पीएसएलमध्ये वेगवान गोलंदाजीचा तर, आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजीचा स्तर मोठा आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजाने पाकिस्तान क्रिकेटशी संवाद साधताना म्हटले की, "पीएसएलमधील खेळाची पातळी चांगली आहे. या स्पर्धेबद्दल सर्वात जास्त प्रभावित करणारी गोष्ट म्हणजे येथे असणारे वेगवान गोलंदाज. मी दक्षिण आफ्रिकासारख्या देशातून येतो. मात्र, मला आश्चर्य वाटते की इथले बहुतेक गोलंदाज १४० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतात. पीएसएलची खरी ताकद हीच आहे."

भारतातील फिरकीपटूमध्ये विविधता
आयपीएलविषयी बोलताना डू प्लेसिस म्हणाला की, "भारतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागतो. आयपीएलमध्ये दर्जेदार फिरकीपटू तुम्हाला पाहायला मिळतील."

डू प्लेसिस देखील आयपीएल २०२१ चा एक भाग होता. मात्र, कोरोनामुळे स्पर्धेला २९ सामन्यांनंतरच स्थगित करावे लागले. डू प्लेसिस २०१४ पासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याने आत्तापर्यंत सात सामन्यात ३७९ धावा केल्या असून यात सलग चार अर्धशतके समाविष्ट आहेत.