काँग्रेस इथून कुठे जाणार

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

काँग्रेस इथून कुठे जाणार

एकेकाळी काँग्रेसचे संपूर्ण देशभरात राज्य होते. अगदी अंदमान पर्यंत काँग्रेस नेते लोकांना माहित होते. आज काँग्रेसच्या ताब्यात फक्त चार राज्ये आहेत. त्यातही दोन राज्ये तर आघाडी करून आहेत. तर महाराष्ट्रात आघाडीमध्ये असूनही काँग्रेसला कुणीही विचारत नाहि. इतकी भयंकर दुर्दशा झाली असतानाही काँग्रेस नेते केवळ पंतप्रधान मोदींवर तोंडसुख घेण्यात धन्यता मानत आहेत. नव्हे ते मोदींवर टिका करण्याच्या नशेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रत्येक वक्तव्यांची माध्यमे दखल घेत असतात. वास्तविक राहुल गांधी यांचे पक्षात काहीही स्थान नाहि आणि राजकारणात तर त्यांचा पक्ष नेस्तनाबूत होत आहे. एक साधा खासदार इतकीच त्यांची पात्रता आहे. तरीही राहुल गांधी यांच्या मागे माध्यमे धावत असतात. पण पश्चिम बंगालमधून काँग्रेस चौरेचाळीस जागांवरून शून्यवर आली, याबाबत कुणीही त्यांना काहीच कसे विचारत नाहि,हा प्रश्न पडतो.  काँग्रेस पक्षातून आता राहुल यांच्याविरोधात आणि सोनिया गांधी यांच्यावरोधात जोरदार आवाज उठू लागतील. कारण पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला शून्यावर आणण्याचे कर्तृत्व राहुल आणि सोनियांनी दाखवले आहे. इतकेच नव्हे तर केरळमध्ये काँग्रेसप्रणित आघाडील यंदा जोरदार झटका बसला आहे. सत्ता मिळणे तर दूरच राहिले, पण चांगली टक्कर देतील असे वाटत असतानाच काँग्रेसची आघाडी भुईसपाट झाली आहे.राहुल य़ांच्यात देशपातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आली असल्याचे वक्तव्य केवळ भाजपद्वेषापोटी केले जात असते. ते आता मौन आहेत. काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष आहे. नेहरू, पटेल यांचा हा पक्ष राजकारणात टिकावा, असेच सच्च्या काँग्रेसप्रेमीला वाटत असेल. परंतु मातापुत्रांच्या जोडीने पक्षाला न घर का न घाट का या अवस्थेत आणून सोडले आहे. काँग्रेसचे अनेक लायक आणि वरिष्ठ नेते गांधी घराण्याचे मानगुटीवर बसलेले ओझे फेकून द्यायला तयार नाहित. वास्तविक सोनिया आणि राहुल हे निवडणुकीत मते मिळवून देऊ शकत नाहित, हे एक लाख वेळा सिद्ध झाले असेल.इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, तेव्हा काँग्रेसचा उमेदवार जिंकून येण्यासाठी त्यांची एक सभा पुरेशी असे. त्यांच्या सभेत कार्यकर्त्यांना केवळ टाळ्या वाजवायचे काम असे. आज काँग्रेसची इतकी अवस्था खराब आहे की बंगालमध्ये पक्ष चौरेचाळीसवरून शून्यावर आला तरीही त्याबद्दल कुणी राहुल किंवा सोनियांच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नही उपस्थित करत नाहि. परंतु आता पाच राज्यांतील निकालांचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवात केरळपासून झाली आहे. तेथे काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्यांनी नेतृत्वबदलाची थेट मागणी केली नसली तरीही नेतृत्वाच्या चुकीच्या धोरणामुळेच पक्षाची दारूण अवस्था झाली आहे, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्यामुळे पक्षाला जागा मिळण्याऐवजी पक्षाचे नुकसानच अधिक होत असल्याचे दिसत आहे.  बंगालमध्ये भाजप तीनवरून सत्त्याहत्तरवर गेला तर काँग्रेस शून्यावर आला. हे काँग्रेसच्या नेतृत्वाचे अपयश आहे. पण काँग्रेसवाले ते उघडपणे बोलण्यास धजावत नाहि. खरे तर त्यांनी उघडपणे बोलायला हरकत नाहि. कारण तसेही ते पक्षात राहिले तरीही विजयी होणारच नाहित. केवळ मोदी यांच्यावर आरोप करत राहिल्याने पक्षाला जागा मिळतील, या समजुतीतून पक्षाने बाहेर यायला हवे. काँग्रेसच्याच प्रवक्त्यांनी याबाबतीत पक्षाला घरचा अहेर दिला आहे. केवळ मोदींना शिव्या घालत राहून आपण आपल्या पक्षाच्या पराभवाचे आत्मचिंतन कधी करणार, असा रास्त सवाल त्यांनी केला आहे. पण काँग्रेस हायकमांडचे हे वैशिष्ट्य आहे. पक्षात लोकशाही आहे, असे म्हणायचे. कुणालाही बोलू द्यायचे मात्र त्याची दखल घ्यायची नाहि. तेवीस नेत्यांनी सोनिया आणि राहुल यांच्याबाबतीत टिका करणारे पत्र पाठवले.त्यावर  चर्चा झाली आणि पुढे काहीच झाले नाहि. मात्र आता पक्षातील नेतृत्वबदलाची मागणी जोर पकडेल, असे दिसते. पुढील वर्षी पंजाबात निवडणूक होत आहे. या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. पण तेथे मुख्यमंत्रि अमरिंदर आणि नवज्योत सिद्धू यांच्यात जोरदार संघर्ष आहे. आणि हा संघर्ष पेटलेला असताना राहुल  किंवा सोनिया यांनी काहीही मध्यस्थी केलेली नाहि. मुळात मातापुत्रांना पक्षात रस आहे की नाहि, हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. इतर कोणत्याही लायक नेत्याकडे सूत्रे सोपवून मातापुत्रांनी आता आराम केल्यासच   काँग्रेस टिकेल, हेच खरे आहे. त्यांना हे मान्य नसेल तर त्यांनी पुढे येऊन आक्रमकपणे नेतृत्व केले पाहिजे. रोज माध्यमांतून मोदी यांच्यावर आरोप करण्याने काहीच साध्य होणार नाहि. इतक्या मोठ्या कोविडच्या महामारीत काँग्रेस कार्यकर्ते कुठेही जनतेच्या मदतीला आल्याचे दिसले नाहित. काँग्रेस नेतृत्वाची जनतेशी नाळ कधीच तुटली आहे. परंतु आता तर त्यांची कार्यकर्त्यांशीही नाळ तुटली आहे. त्यामुळे पक्षच आणखीच गर्तेत चालला आहे. इथून पुढे कांग्रेसचे काहीही वाईट व्हायचे शिल्लक नाहि. त्यामुळे काँग्रेस पक्ष इतिहासजमा होणार की काय, अशी भीती वाटते.