महाराष्ट्राची आवृत्ती छत्तीसगढमध्ये

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्राची आवृत्ती छत्तीसगढमध्ये

महाराष्ट्रात सध्याचे मुख्यमंत्रि उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांनी आपल्याला कबूल केलेले मुख्यमंत्रिपद दिले नाहि, अशी तक्रार करत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून सत्ता काबिज केली. ठाकरेंचा हा धक्का भाजपला खूप जड गेला. भाजप नेते अमित शहा यांनी सातत्याने असा काही शब्द दिला नव्हता, असा खुलासा केला आहे. त्यांनी ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद काहीही करून मिळवायचेच होते, म्हणून त्यांनी हे निमित्त शोधून काढले, असाही आरोप केला होता. याच प्रकाराची पुनरावृत्ती आता छत्तीसगढमध्ये होत आहे. फरक इतकाच आहे, छत्तीसगढमध्ये काँग्रेसच्याच दोन गटांत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्रि भूपेंद्र बघेल आणि टी एस सिंग देव यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून हाणामार्या सुरू आहेत. सिंग देव यांचा दावा असा आहे की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून देण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार पहिली अडीच वर्षे बघेल आणि उरलेली अडीच वर्षे सिंगदेव यांना मुख्यमंत्रिपद दिले जाणार होते. परंतु आता अडीच वर्षे संपली तरीही बघेल पद सोडण्यास तयार नाहित. तर बघेल हे प्रथमपासून असे काही ठरले नाहि, हे सांगत आहेत. काँग्रेस नुकतीच कुठे पंजाबातील राजकीय तंट्यावर मतभेद काढून सुटकेचा श्वास घेत नाहि, तोच हे छत्तीसगढचे संकट उभे राहिले आहे. अमरिंदर आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वाद सोडवण्यात काँग्रेस श्रेष्ठींची कसोटी लागली होती. तरीही येत्या निवडणुकात दोन्ही गट खरोखर मनमिळाऊपणे काम करतील की नाहि, याची काहीही शाश्वती नाहि. छत्तीसगढच्या बाबतीत एकच दिलासा आहे की निवडणुकीला अजून पुरती अडीच वर्षे अवकाश आहे. सावकाश तोडगा शोधता येईल. मात्र सिंगदेव यांचे टायमिंग अचूक आहे. पंजाबसारखी निवड़णूक तोंडावर आली असताना गटबाजी उफाळून आलेली आहे. छत्तीसगढ हे छोटेसे राज्य आहे आणि कांग्रेसच्या दृष्टिने त्याचे राजकीय महत्व फार नाहि. तरीही सत्ता असलेले राज्य म्हणून काँग्रेसला ते हातून गमावणे परवडणार नाहि. आधीच काँग्रेसच्या हातात केवळ तीन राज्ये आहेत आणि त्यातही पंजाबात सातत्याने राजकीय तंटे निर्माण होत आहेत. राजस्थान तर कधीही काँग्रेसच्या हातून जाऊ शकते, अशी परिस्थिती आहे. याचे कारण नाराज असलेला सचिन पायलट गट. जास्त काळ पायलट गटाला काँग्रेस नाराज ठेवू शकत नाहि. त्यावर आज न उद्या उभयमान्य तोडगा काढावाच लागेल. परंतु त्याअगोदर छत्तीसगढची डोकेदुखी दूर करावी लागेल. काँग्रेसला जास्त धोका आहे तो भाजप या नाराजीचा फायदा घेऊन सरकारमध्ये जोरदार सुरूंग लावू शकतो, त्याचा. भाजपच्या नेत्यांनी आतापासूनच सिंग देव गटाला चुचकारण्याचे प्रयत्न सुरूही केले असतील. काँग्रेस स्वतःच केंद्रिय नेतृत्वाच्या बाबतीत पेचात सापडली आहे. राहुल गांधी यांना पक्षाचे नेतृत्व करण्यात रस आहे की नाहि, हे कुणालाच अगदी सोनिया गांधी यांनाही माहित नाहि. त्यामुळे काँग्रेस स्वतःच चाचपडत आहे. त्यात तेवीस नेत्यांनी काँग्रेसच्या केंद्रिय नेतृत्वालाच आव्हान दिले आहे. ज्या काँग्रेस श्रेष्ठींचे अस्तित्वच पणाला लागले आहे, त्यांनी काढलेला तोडगा छत्तीसगढमधील नेत्यांना मान्य होईल की नाहि, हेही माहित नाहि. काँग्रेस नेतृत्वाने सिंग देव यांना तूर्तास गप्प रहाण्याचा सल्ला दिला तर ते मंत्रिमंडळात रहाणार नाहित, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र ते बाहेर राहून शांत बसणार नाहित. ते बघेल सरकार कसे पडेल, याची तजवीज करू लागतील. असा नेता जास्त धोकादायक असतो. तेव्हा काँग्रेस नेतृत्वाला हे प्रकरण असेच  लटकत ठेवणे परवडणारे नाहि.  पंजाब आणि  उत्तरप्रदेश या अत्यंत महत्वाच्या राज्यांत येत्या सहा महिन्यात निवडणुका होत असताना छत्तीसगढमध्ये अशी खुर्चीवरून हाणामारी होणे हे पक्षासाठी चांगले तर नाहिच. परंतु चुकीचा संदेश जाणार आहे. त्यामुळे आता खरी कसोटी राहुल गांधी यांची लागणार आहे. कारण मंगळवारी दोन्ही नेते राहुल यांना भेटून आपले गार्हाणे मांडणार होते. त्यातून राहुल काय तोडगा काढतात, याकडे लक्ष असेल. बघेल आणि सिंग देव यांच्यात संघर्ष उडण्याची कारणे ही केवळ सत्तेची हाव हीच आहे. दोघांकडेही काही चांगले मुद्दे आहेत, असे काही नाहि. दोघांनाही हीच सत्ता प्राप्त करण्याची संधी आहे. भविष्यात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल की नाहि, याची दोघांनाही शाश्वती नाहि. म्हणून आताच संधी आहे, असे समजून सिंग देव गटाने उचल खाल्ली आहे. छत्तीसगढ राज्य हे अत्यंत मागास आहे. तेथे बघेल सरकारने काही चांगली कामे केली आहेत. परंतु राजकीय साठमारीत त्यांची ही कामे मागे पडली आहेत. अर्थात आज न उद्या काँग्रेस नेतृत्वासमोर हा प्रश्न येणार, हे राजकीय जाणकारांना माहित होते. कारण बघेल आणि सिंगदेव यांच्यातील वाद काही महिन्यांपासून धूमसत होता. तेव्हा सिंगदेव यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षा चांगल्याच जागृत झाल्या होत्या. आता दोन राज्यांतील निवडणूक असल्याने काँग्रेस नेतृत्वाला आपल्या दाव्यावर तोड काढावीच लागेल, हे हेरून सिंग देव यांनी अचूक टायमिंग साधले आहे. त्यांच्या टायमिंगला दाद देतानाच काँग्रेस नेतृत्वासमोर केवढे मोठे आव्हान उभे आहे, याचीही दखल घ्यावी लागेल.