धोक्याची घंटा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

धोक्याची घंटा

तौक्ते वादळाने महाराष्ट्राला विशेषतः मुंबईला जोरदार तडाखा सोमवारी दिला आणि कितीही तयारी प्रशासनाने करूनही व्हायचे ते नुकसान झालेच. निसर्गाच्या आक्रमणापुढे मनुष्याची व्यवस्थापन कौशल्य चालत नाहि, हे वारंवार सिद्ध झाले आहे. अर्थात, व्यवस्थापन कौशल्य किती कुशलतेने केले गेले आहे, यावरही बरेच काही अवलंबून आहे. तौक्ते वादळाने अरबी समुद्रावर ताशी एकशे पासष्ट किलोमीटर वेगाने स्वतःभोवती गिरक्या घेणारे चक्रीवादळ घोंघावत आले. पण रायगड जिल्ह्याला जास्त नुकसान सोसावे लागले. सहा जणांचा बळीही गेला. पण सर्वात मोठे आव्हान आहे ते ओएनजीसी जहाजावरील लोकांना वाचवण्याचे. ओएनजीसीच्या बाँबे हाय जवळच्या पापा जहाजाला या चक्रीवादळामुळे जलसमाधी मिळाली आणि त्यावरील एकशे सत्तेचाळीस जणांना वाचवण्यात यश आले आहे. परंतु दोनशे साठ लोक त्या जहाजावर आहेत. उरलेल्यांना शोधणे हे मोठेच आव्हान आता नौदलासमोर आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना वादळी पावसाने झोड़पून काढले. गेल्यावर्षी निसर्ग वादळाने असाच हाहाःकार उडवला होता. यंदा त्याची जागा तौक्तेने घेतली आहे. प्रशासन बर्यापैकी सज्ज होते त्यामुळे फार नुकसान झाले नाहि, अशी पाठ प्रशासन स्वतःचीच थोपटून घेऊ शकते. परंतु जे आर्थिक नुकसान प्रचंड झाले, त्याची भरपाई कशी करणार हा प्रश्न आहे. गेल्या वर्षी निसर्गप्रमाणेच यंदाही तौक्तेने खरा प्रलय घडवून आणला तो कोकणात. दोन्ही वादळे आली ती कोरोनाच्या लाटेतच. त्यामुळे कोविड रूग्णांना सुरक्षित स्थळी हलवणे हे एक नवेच काम प्रशासनासमोर उभे रहाते. ते करावेच लागते कारण कोविड रूग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. अगोदरच ऑक्सिजनअभावी तळमळणार्या कोविड़ रूग्णांचे वादळामुळे हलवण्यात येत असताना हाल पहावत नाहित. कोविडच्या साथीला आता निसर्गानेही महाराष्ट्राला तडाखे देण्यात पुढाकार घेतला आहे, असे दिसते. आणि यात बळी जाणारी ही सामान्य माणसे आहेत. ही कुणी सेलेब्रिटी किंवा बड्या बापांची पोरं नाहित. सामान्य आणि अगदीच हातावर पोट असलेल्याच लोकांना निसर्गही हालात टाकत असतो. कोकणाचे हाल तर कुत्रा खाणार नाहि, अशी स्थिती आहे. एरवीच लॉकडाऊनमुळे हजारो जीव घरात अडकून पडले आहेत. त्यांना आता वादळामुळे शेतात किती नुकसान झाले, हे जाऊन पहाण्याची सोयही राहिलेली नाहि. मुंबई आणि कोकणात प्रचंड वादळ आणि पावसाने अनेक झाडे कोसळली आणि नेहमीप्रमाणे विजेचे खांब पडून अनेक भाग अंधारात गेले. हे अपेक्षितच होते. कितीही अपेक्षा केली तरीही हाल होतातच. चक्रीवादळ आता गुजरातकडे गेले आहे आणि तिकडे संकट आले आहे. परंतु एक गोष्ट मात्र नव्याने समोर आली आहे. ती खास करून कोकण आणि मुंबईवासियांची झोप उडवणारी आहे. नव्या संशोधनात असे आढळले आहे की, अरबी समुद्रात वारंवार चक्रीवादळे आता निर्माण होणार आहेत. कारण अरबी समुद्राचे तपमान वाढले आहे. पूर्वी अशी चक्रीवादळे बंगालच्या उपसागरावर निर्माण व्हायची. आता हे चक्र अरबी सागराकडे वळले आहे. अरबी समुद्राचे तपमान अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त झाले आहे. यामुळे भविष्यात वारंवार मुंबई आणि कोकणला वादळाचे तडाखे बसत रहाणार आहेत. अर्थात आपण पर्यावरणाकडे लक्ष देत नाहि, हे त्याचे खरे कारण आहे. नुसते आरे वसाहतीत मेट्रोचे काम बंद पाडणे इथपर्यंतच आपली पर्यावरण रक्षणाची कल्पना आहे. मुंबईचे समुद्रकिनारे हटवून तेथे उंच इमारती उठवणे याला कुणीही आळा घातला नाहि. कारण यात कल्पना करता येणार नाहि, इतका अफाट पैसा आहे. राजकारणी, बिल्डर आणि नगरसेवक यांच्या अभद्र युतीने मुंबईला अक्षरशः वस्त्रहीन केले आहे. त्यामुळे समुद्र हटत  गेला आणि सिमेंटची जंगले निर्माण झाली. त्यातून तपमानवाढ अपरिहार्य होतीच. ती झाली आणि आता चक्रीवादळे वारंवार येणार आहेत. हेच चक्र चालू रहाणार आहे कारण कुणालाच शहाणपणा येण्याची शक्यता नाहिच. परिणामी दोन हजार पन्नासपर्यंत अर्धी मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. ज्यांची तोपर्यंत आपण जगणार नाहि, अशी खात्री आहे, त्यांना या माहितीचे काहीच वाटणार नाहि. परंतु ज्यांना त्यापुढे जगायचे आहे, त्यांना याचे गांभिर्य निश्चित जाणवेल. तसेही समुद्रावरील अतिक्रमणांमुळ पाण्याची पातळी वाढत आहे. त्यात तपमानवाढीची जोड मिळाली आहे. त्यातून मुंबईवर महाभयानक संकटे ओढवणार आहेत. त्यांचे गांभिर्य न समजणारे राज्यकर्ते असले तर मुंबईच काय पण महाराष्ट्रालाही कुणीही वाचवू शकणार नाहि. आता वादळाची पूर्वसूचना देणारी यंत्रणा चांगली विकसित झाली आहे. त्यामुळे राज्यांना तयारीला वगैरे बराच वेळ मिळतो. म्हणून नुकसान कमी करता येते. तसे यंदाही झाले. परंतु हेही कायम होत राहिल, असेही मुळीच नाहि.  निसर्गाचा तडाखा सतर्क असले काय किंवा नसले काय, बसतच असतो. आता वादळाच्या नुकसान भरपाईच्या मागणीवरून राजकारण रंगेल. विरोधी पक्ष जास्तीत जास्त पैशांची मागणी करेल आणि सत्ताधारी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावतील. हेच पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा त्यांनीही हेच केले होते. हा एक नवीनच राजकीय अध्याय आता सुरू होईल. तितका काळ कोरोनावरून लक्ष वळवले जाईल, हाही एक सत्ताधार्यांना फायदाच होईल. पण तौक्तेने मुंबई  आणि कोकणच्या अस्तित्वालाच धोक्याची घंटा वाजवली आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहि.