मुंबईतील दोन क्रीडा संकुलांचे खाजगीकरण करण्याचा घाट, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईतील दोन क्रीडा संकुलांचे खाजगीकरण करण्याचा घाट, नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई,: मुलुंडमधील ललित कला प्रतिष्ठान आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाच्या खासगीकरणाला भाजपा आमदार वितेश राणे यांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भात राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही पाठवले आहे. यामध्ये उपरोक्त क्रीडा संकुलांचे खाजगीकरण करण्याचा घाट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे कार्यालयीन अधिकारी देवेंद्रकुमार जैन यांच्यामार्फत घातला जात आहे. हे खाजगीकरण थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा . राणे यांनी दिला आहे.

या पत्रामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला असून त्यांनीच मुंबईकरांना जलतरण आणि बाग यांसारख्या सेवा मिळाव्यात म्हणून या सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. बाळासाहेबांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच मराठी माणूस होता. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्याच उद्देशाने सर्वसामान्यांना जलतरण तलाव, बाग यांसारख्या सोयी मिळाव्यात म्हणून मुंबई कला प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. मात्र बाळासाहेबांनी स्थापन केलेले हे प्रतिष्ठान आता भ्रष्टाचाराचे केंद्र झाले आहे, असा संताप सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच या दोन्ही क्रीडा संकुलांचा कारभार हा पारदर्शक नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. असे असतानाच महापौरांचे निकटवर्तीय अधिकारी असणाऱ्या देवेंद्रकुमार जैन यांच्या हस्तक्षेपाने या दोन्ही क्रीडा संकुलांच्या खाजगीकरणाचा घाट घातला जात आहे. ही खासगीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात यावी. हे खाजगीकरण झाल्यास या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, अशी भीती आहे. या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास त्यांना घेऊन आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करू. तसेच या क्रीडा संकुलांमधील जलतरण तलाव नफ्यामध्ये आहेत. असे असतानाही त्यांचे खाजगीकरण करण्याची काय गरज आहे, असा प्रश्नही राणेंनी विचारला आहे.