भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला पोलिसांचा दणका

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेला पोलिसांचा दणका

मुंबई : केंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सुरु केलेल्या जनआशीर्वाद यात्रेला आता पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. आत्तापर्यंत या यात्रेवर ३० हून अधिक गुन्हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. भाजपा नेत्यांनी काढलेल्या या यात्रेमध्ये करोना प्रतिबंधाचे नियमही धाब्यावर बसवल्याचं निदर्शनास आलं आहे.

भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये सात वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आत्तापर्यंत या यात्रेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या ३६ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या यात्रेदरम्यान त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मोठी गर्दी जमवली. त्यामुळेही करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन झालं. तर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा विनापरवाना काढण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी यात्रेचे आयोजन करण्याऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ठाण्यातल्या या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान करोना प्रतिबंधाच्या नियमांचा फज्जा उडाला होता. तर या यात्रेदरम्यान काही चोरटेही गर्दीत शिरले होते. त्यांनी काही जणांचे मोबाईल आणि रोकडही चोरी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.