तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाची सज्जता – डॉ. प्रदीप व्यास

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभागाची सज्जता – डॉ. प्रदीप व्यास

नवी दिल्ली : करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग रुग्णालयीन व्यवस्था वाढविण्याबरोबर परिणामकारक उपचार देण्यासाठी डॉक्टरांच्या प्रशिक्षणावरही भर देत आहे. प्रामुख्याने या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणात असतील ही तज्ज्ञांची माहिती लक्षात घेऊन लहान मुलांवरील करोना उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लागू शकतो हे लक्षात घेऊन मिशन ऑक्सिजन स्वावलंबनयोजना युद्धपातळीवर राबविण्यात येणार असल्याचेही डॉ प्रदीप व्यास म्हणाले. करोनाच्या पहिल्या लाटेत तीन लाख अॅक्टिव्ह रुग्ण होते तर दुसऱ्या लाटेत ही संख्या सात लाख एवढी झाली होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तिसर्या लाटेत दहा लाखापेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण असतील हे गृहित धरून आरोग्य विभागाची व्यवस्था अधिक बळकट केली जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार आरोग्य विभागासाठी १६ हजार पदे भरण्याचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. आमच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे परिणामकारक व वेळेत उपचार देणे याचे सर्वाधिक महत्व असून त्यासाठी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांसाठी विशेष कार्यक्रम राबवला जाणार असल्याचे डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले.

पहिल्या लाटेत ५० वयोगटापुढील लोकांना प्रामुख्याने लागण झाली व याच वयोगटातील लोकांचे जास्त मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेचा फटका हा तरुण वर्गाला बसला तर तिसरी लाट ही लहान मुलांसाठी त्रासदायक ठरणार असल्याचे केंद्र सरकार व तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे लक्षात घेऊन ऑक्सिजन खाटांची संख्या वाढवणे, लहान मुलांची वेगळी व्यवस्था करताना त्यांच्यावरील उपचाराला विशेष प्राधान्य द्यावे लागणार आहे. लहान मुलांसोबत आई असणे आवश्यक असल्यामुळे खाटा व उपचाराची रचना करताना वेगळी व्यवस्था करावी लागेल.करोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी कृती दलाच्या माध्यमातून उपाययोजना सांगितल्या जातीलच तथापि त्याच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. लहान मुलांमध्ये आईची गरज असणारे व १२ ते १८ वयोगटातील मुले अशी वर्गवारी करावी लागेल तसेच या मुलांना औषध व उपचारासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. ज्या तुलनेत लहान मुलांमध्ये करोनाची लागण होईल अशी भीतीव्यक्त केली जात आहे. त्या तुलनेत लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध नसतील हे लक्षात घेऊन उपचार करणार्या डॉक्टरांना प्रशिक्षित करावे लागणार आहे. मुळात लहान मुलांना रेमडेसिवीर वा स्टिरॉइड देण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मधुमेह व उच्च रक्तदाबादी आजार असलेल्या करोनाबाधित मोठ्यांनाही रेमडेसिवीर व स्टिरॉइडचे प्रतिकूल परिणाम झाल्याचे आता दिसून येत आहे. परिणामी लहान मुलांसाठी खाटा तसेच स्वतंत्र व्यवस्था करताना औषधोपचाराचा स्वतंत्रपणे विचार करावा लागणार असल्याचे डॉ व्यास म्हणाले.