नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मंदिरात दररोज 15 हजार भाविकांनाच प्रवेश

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मंदिरात दररोज 15 हजार भाविकांनाच प्रवेश

उस्मानाबाद,: शारदीय नवरात्रोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे, या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा तुळजापूर मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी लेखी आदेश काढले आहेत. यात त्यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत आदेश वजा मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत.

-अभिषेक इतर विधींना परवानगी नाही!
उपरोक्त आदेशात म्हटले आहे की, भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत, सेवेकरी आणि मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत.

-परराज्यातील भाविकांसाठी नियम
परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासांच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.

-हॉटेल, दुकान कर्मचाऱ्यांना दोन डोस बंधनकारक
यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचाऱ्यांचे दोन डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे.

-पहाटे 4 ते रात्री 10 वेळेत भाविकांना प्रवेश
गर्दी होऊ नये आणि कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यात 15 हजार भाविकांची प्रवेश मर्यादा असणार आहे.

कोजागिरी पौर्णिमा रद्द, 18 ते 20 ऑक्टोबर जिल्हा बंदी
नवरात्र उत्सवातील कोजागिरी पौर्णिमा रद्द करण्यात आली आहे. तर या काळात 18 ते 20ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात जिल्हा बंदी, तर तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांसह देशभरातून नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या तीन दिवसांत एकाही भाविकाला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. पौर्णिमेच्या अगोदर एक दिवस पौर्णिमेच्या दिवशी आणि पौर्णिनेनंतर एक दिवस असे तीन दिवस तुळजापूरात संचारबंदी राहील, तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.

-'यांना' प्रवेश नाही!
तुळजाभवानी मंदिरात 65 वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि १० वर्षांखालील बालके यांना प्रवेश नसणार नाही, याबाबत मंदिर व्यवस्थापनाने उपाययोजना कराव्यात.

-अन्य नियम
मास्क, सॅनिटायझर वापरावे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मंदिराच्या परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी केले आहे.