पुढचे पाऊल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

पुढचे पाऊल

पश्चिम बंगालमध्ये भाजपचे कडवे आव्हान मोडून काढत ममता बॅनर्जी यांनी सत्ता टिकवली. इतकेच नव्हे तर जागाही पूर्वीसारख्याच मिळवल्या. यावेळच्या यशाला जास्त महत्व आहे कारण अर्ध्याहून अधिक तृणमूल काँग्रेसला भाजपने आपल्या पदराखाली घेतले होते. शिवाय भाजपचे नेते इतक्या आवेशात प्रचार करत होते. स्वतः मोदी आणि अमित शहा यांनी तर जणू कोलकत्ताला आपले दुसरे घर बनवले होते. पण बंगालच्या मतदारांनी ममतांच्या पदरात भरभरून जागा घातल्या. परंतु त्याचवेळी मतदारांनी भाजपलाही तीन वरून एकदम ऐंशी जागांवर नेले आहे. भाजपचे हे यश कोणत्याही अर्थाने पाहिले तर उत्तुंगच आहे. मोदी शहा यांनी ममतांना हरवण्याच्या अतिरेकी वल्गना केल्या नसत्या तर हे यश नेत्रदीपक ठरले असते. ही लढाई ममतांसाठी फारच महत्वाची होती. कारण त्यांच्यासाठी हा इतिहासजमा होण्याचा किंवा इतिहास घडवण्याचा प्रश्न होता. इव्हीएम यंत्रांनी जसा जनादेशाचा कौल जाहिरकरण्यास सुरूवात केली, तसे बंगालच्या लोकांनी इतिहास घड़वण्याच्या बाजूने कौल दिला आहे, असे स्पष्ट झाले. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी सलग तिसर्यांदा तृणमूल काँग्रेसला आणखी एक शानदार विजय मिळवून दिल्यानंतर अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.  प्रस्थापित विरोधी लाटेविरोधात आणि भाईभतिजावाद तसेच तृणमूलमधील पक्षपातीपणाच्या एकाहून एक प्रखर आरोपांवर मात करून, ममता बॅनर्जी आजच्या काळातील बंगालच्या राजकारणात सर्वात उत्तुंग नेत्या म्हणून उदयास आल्या आहेत. आणि दुसरे म्हणजे,
आजच्या विजयामुळे, केंद्रातील भाजपविरोधी पक्षांच्या गटातील सर्वात आघाडीवरील नेत्या म्हणूनही ममता बॅनर्जी या उभरल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे तृणमूलच्या राष्ट्रीय आकांक्षा तसेच संपूर्ण भारतभराच्या राजकीय अवकाशात त्यांच्या नेतृत्वाला वाढत्या प्रमाणात मान्यता मिळत असल्याचीही खात्री पटली आहे.
मतदारांचे धार्मिक आधारावर ध्रुविकरण करण्याची भाजपची मोहिम त्यांच्यावरच अक्षरशःउलटली आहे, असे बंगालमधील सूक्ष्मपातळीवरील स्थितीकडे डोकावून पाहिले असता सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट दिसते. माल्दा आणि मुर्शिदाबाद तसेच दक्षिण 24 परगणा आणि उत्तर  24 परगणा तसेच हावडा जिल्ह्यातील काही भागांतील आलेले निकाल, मुस्लिम मतदारांनी कोणत्याही अन्य पक्षांपेक्षा तृणमूल काँग्रेसचा पर्याय निवडला आहे, असेच दर्शवतात. माल्दा आणि मुर्शिदाबाद हे काँग्रेसचे एकेकाळी बालेकिल्ले होते. त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला एकगठ्ठा मतदान केले आहे. ममता आणि तृणमूल काँग्रेस यांच्या अनेक चुका आणि त्यांच्यावर कित्येक आरोप असतानाही, केवळ भाजपला दूर ठेवण्यासाठी त्यांनी तृणमूल काँग्रेसला निवडले
आहे, याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. बंगालमधील तिसरा राजकीय अवकाश म्हणून ओळखली जाणारी डावी आघाडी आणि त्यांचे मित्र पक्ष, काँग्रेस आणि एआयएसएफ हे आणखीच आकुंचित झाले आहेत. याचे कारण काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या परंपरागत मतदारांनी तृणमूल काँग्रेसला निवडले आहे. येथेही साधे कारण आहे. 2019 मध्ये भाजपने जी मुसंडी मारली होती, ती थांबवण्यासाठी त्यांनी ममतांना मतदान केले आहे. भाजपने 2019 मध्ये 18 लोकसभा जागा जिंकल्यामुळे त्यांचे रूपांतर 121 विधानसभा मतदारसंघातील विजयामध्ये होईल, अशी भाजपला आशा होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा करिष्मा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच कैलाश विजयवर्गीय, बीएल संतोष आणि अरविंद मेनन यांनी तयार केलेली मतदानविषयक व्यूहरचना यावर भाजपची मदार होती. ममता बॅनर्जी आणि त्यांची व्यूहनीती आखणार्यांनी शांत राहून तयार केलेल्या वेगळ्याच अंतप्रवाहाला समजून घेण्यात भाजप अपयशी ठरला. भाजपच्या नेत्यांनी जितक्या अधिक प्रमाणात पिशी भांजो(मावशी-भाचा) संबंधांवर टिका केली, भाजपच्या योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या नेत्यांनी माल्दासारख्या जिल्ह्यांमध्ये बंगालमध्ये अँटी रोमिओ पथके तयार करण्याच्या अधिक जोरकसपणे घोषणा केल्या, ममतांनी तितक्याच जोरदारपणे आपल्या तेथील ताकदीवर लक्ष केंद्रित केले. ममतांनी प्रचारातून दोन शक्तिशाली संदेश दिले- पहिला म्हणजे दुआरे सरकार(सरकार तुमच्या दारात) कार्यक्रम, ज्यामुळे नावनोंदणी करून सामाजिक लाभाच्या योजनांचा फायदा घेण्यासाठी कँप कार्यालयात मोठ्या प्रमाणात जमाव येत होते. दुआरे सरकार कार्यक्रमातच स्वास्थ्य साथी कार्ड हेही होते ज्यात प्रत्येक लाभार्थी कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ महिला सदस्याच्या नावाने कार्ड दिले जात होते. यामुळे महिला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळेल, याची ममतांनी सुनिश्चिती केली. आणि तृणमूल काँग्रेसने बोहिर्गोतो(बाहेरचा) या घटकावर प्रचारात जोरदार भर
दिला. तृणमूल काँग्रेसच्या बांगला निजेर मेये केई छाये(बंगालला त्याची स्वतःची कन्या मुख्यमंत्रि म्हणून पाहिजे) या मोहिमेचाही बंगालमधील राजकीय व्यवस्थेत बरोबर मोठ्या प्रमाणात प्रभाव
पडला. तरीसुद्धा, ज्या बंगाल विधानसभेंत 2016 साली भाजपला गेल्या वेळेस अवघ्या तीन जागा होत्या, तेथे आता विधानसभेत 80 जागा जिकंण्याच्या मार्गावर भाजप आहे. राजकीय गणिताच्या दृष्टिने पहायचे तर, भाजपने 2019 मध्ये जे यश मिळवले होते, त्याचीच पुनरावृत्ती केली आहे. लोकसभेला केवळ दोन जागांवरून भाजपने 18 जागा जिंकून चमकदार प्रदर्शन केले होते. पण यावेळी राजकीय केमिस्ट्रीने राजकीय गणितावर मात केली आहे. नादिया आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यांच्या काही भागात जेथे मातुआ मतदार मोठ्या संख्येने आहेत आणि उत्तर बंगालमध्ये, विशेषतः जलपायगुडी, अलिपूरदार आणि कूचबिहारमध्ये, राजबंसी मतदारांनी निवडणूक निकालांमध्ये निर्णायक भूमिका बजावली नसती तर भाजपला फार किरकोळ जागा मिळाल्या असत्या. निवडणूक व्यूहनीतीकार प्रशांत किशोर यांनी आपले काम चोख बजावले आहे. बंगाल विधानसभेत भाजप प्रथमच विरोधी पक्ष म्हणून प्रवेश करत आहे. डावी आघाडी आणि त्यांच्या मित्रपक्ष याहीवेळी कोरडेच राहिले आहेत. पण 2021 च्या उन्हाळ्यात ममता बॅनर्जी खंबीर
आणि राष्ट्रीय राजकीय परिदृष्यावर आणखी उंच भरारी घेतलेल्या नेत्या म्हणून उभरल्या आहेत, ज्यांचा 2014 साठीचा प्रतिक्षाकाळ आता सुरू होत आहे. आता दोन हजार चोविसच्या निवडणुकीत कदाचित सारे विरोधी पक्ष ममतांच्या नेतृत्वाखाली एकवटतील. ममता या मोदींना पर्याय होऊ शकतील की नाहि, हा फार दूरचा प्रश्न आहे. परंतु बंगाली महिला देशाच्या राजकारणावर प्रचंड उंचीने उभरली आहे. विरोधकांना ममतांच्या रूपाने पर्याय मिळाला आहे,  असे दिसते आहे. अर्थात नीतिशकुमार यांच्याही रूपाने त्यांना असा पर्याय दिसला होता. परंतु नीतिशकुमार हे स्वतःच भाजपच्या कळपात गेले. त्यामुळे ममता ही एकमेव आशा सार्या विरोधकांपुढे उरली आहे. अर्थात एकवीस पक्षांचे महागठबंधन तयार केले होते त्यातही ममता होत्याच. परंतु त्यांचा काहीही प्रभाव पडला नव्हता. ममता केवळ राज्यातच प्रभावी आहेत का, हे पहावे लागेल. खुद्द राज्यात त्या पराभूत झाल्या आहेत. त्यांचे पुढचे पाऊल मात्र आता दिल्लीच असेल, असे दिसते.