नेटफ्लिक्सवर रिलीज होणार रितेश देशमुखचा नवा चित्रपट ‘प्लॅन ए प्लॅन बी'

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

नेटफ्लिक्सवर रिलीज होणार रितेश देशमुखचा नवा चित्रपट ‘प्लॅन ए प्लॅन बी'

बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या कॉमेडी आणि रोमॅण्टिक अंदाजात चाहत्यांचं मन जिंकणारा अभिनेता रितेश देशमुख आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी उत्साहित झालाय. अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘फ्रेडी’ आणि ‘वीरे दी वेडिंग’ सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे शशांक घोष हे रितेशच्या नव्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुखचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आलाय. अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा हा फर्स्ट लूक शेअर केलाय. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो मुंबईतल्या एका कुटूंब न्यायालयाच्या आवारात उभा असलेला दिसून येतोय. तसंच ‘नुकतंच घटस्फोटीत आणि सुखी’ असं लिहिलेली एक पाटी त्याने हातात पकडलेली दिसून येतेय. तर त्याने शेअर केलेल्या आणखी दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्यासमोर अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील दिसून येतेय. त्यामूळे या चित्रपटाच्या कहाणीबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. याची कथा एका मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकीलाभोवती फिरते. यात त्याचं स्वतःचं एक रहस्य आहे. मॅचमेकरला वाटतं की त्याच्याशिवाय प्रत्येकाने लग्न केलं पाहिजे. जेव्हा मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकीस हे दोघे एकमेकांना भेटतात तेव्हा चित्रपटात काय मजेदार कहाणी घडू शकते, हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय. ‘वन्स अपॉन टाइम इन मुंबई’, ‘डर्टी पिक्चर’, ‘किक’ आणि ‘गब्बर इज बॅक’ यासारखे चित्रपटांचं लेखन करणारे रजत अरोरा यांनी या चित्रपटाची कथा लिहीलीय. रितेश आणि तमन्ना भाटिया व्यतिरिक्त अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला देखील या चित्रपटात झळकणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 190 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होईल. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ विषयी बोलताना दिग्दर्शक शशांक घोष म्हणाले, “नेटफ्लिक्ससह प्लॅन ए प्लॅन बी ची घोषणा करताना मी खूप उत्साहित आहे. ही एक अनोखी कथा आहे. यात असमान्य पात्र एकमेकांच्या विरोधात असतील. सोबतच प्रेमाला नव्या रूपात सादर करणार आहेत. नेटफ्लिक्सवर जगभरातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट बनवण्याचा मला पूर्णपणे आनंद झाला आहे आणि मला खात्री आहे की लोकांना ते आवडेल.”