बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय - जयंत पाटील

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय - जयंत पाटील

बीड: जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल, जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांनी केले. जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी तथा संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पाटील यांनी जलसिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढ गरजेचे आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी साठवण प्रकल्पांचे उंची वाढविण्यासाठी प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा विचार करून निर्णय घेऊ. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होवून ग्रामीण जीवन समृध्द करणे हा आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने मराठवाड्यात ज्याठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील असे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले

यावेळी जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यासह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जयंत पाटील यांचे आभार मानले.  

याप्रसंगी शेतीसाठी पाण्याचे समान वाटप, सिंदफना, माजलगाव आदी प्रकल्पांसह जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांचा दुरुस्ती कामांचा आढावा आणि निर्माण झालेले अडथळे दूर करून कामे तात्काळ सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आलेे.यावेळी जयंत पाटील यांनी प्रकल्पाविषयी लोकप्रतिनिधींच्या सुचना विचारात घेवून योग्य ते निर्देश देवून कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्यासाठी त्या कामांचा आढावा घेतला. बैठकीत सुरुवातीला जलसंपदा विभागाच्यावतीने माहिती सादर करण्यात आली जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची माहिती, पुर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती, कामे सुरू प्रकल्पांची सर्वसाधारण माहिती, प्रस्तावित प्रकल्पांबाबत, जिल्ह्यातील प्रकल्पांद्वारे निर्मित सिंचनक्षमता, चालू वर्षातील उपलब्ध आर्थिक तरतूद व आवश्यक निधी, जिल्हयातील प्रकल्पात असलेला पाणीसाठा,जिल्ह्यातील जलप्रकल्पांची सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत बीड जिल्ह्यातील परळी,अंबाजोगाई व केज तालुक्यातील विविध गावात अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा करत पाहणी केली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागात सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती दिली तसेच प्रत्यक्ष घटनास्थळी व पूर पीडितांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.