भाजपने केली पाच राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

भाजपने केली पाच राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर (हिं.स) पुढील वर्षी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय संगठन मंत्री बी एल संतोष यांनी सर्व निवडणूक प्रभारी आणि सह प्रभारींना शुभेच्छा दिल्या. ट्वीटरद्वारे अधिकृत यादी प्रदर्शित करताना बी एल संतोष म्हणाले, "सर्व निवडणूक प्रभारींना आगामी निवडणुकीसाठी शुभेच्छा "

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. यासोबत सोमवारी केंद्रीय संस्कृती,पर्यटन आणि ईशान्य भारत विकास मंत्री गंगापूरम किशन रेड्डी तसेच केंद्रीय रेल्वे आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जर्दोश यांना सहप्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना मुख्य प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. यासोबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, शोभा करंदलाजे, अर्जुन राम मेघवाल, खासदार सरोज पांडे, कॅप्टन अभिमन्यू आणि विवेक ठाकूर सह-प्रभारी असतील.

पंजाबमध्ये केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत प्रभारी असतील तर केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीप सिंह पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी सह-प्रभारी असतील.
मणिपूरसाठी केंद्रीय पर्यावरण, श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केले असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री प्रतिमा भौमिक आणि आसाम सरकारचे मंत्री अशोक सिंघल सह प्रभारी असणार आहेत. उत्तराखंडसाठी केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी प्रभारी असतील तर खासदार लॉकेट चॅटर्जी सह प्रभारी म्हणून कार्य करतील.