कोरोना लसीकरणाने पार केला 92 कोटी मात्रांचा टप्पा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

कोरोना लसीकरणाने पार केला 92 कोटी मात्रांचा टप्पा

नवी दिल्ली : देशात आज, बुधवारी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 59,48,360 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांच्या संख्येने 92 कोटी मात्रांचा (92,17,65,405) टप्पा पार केला आहे. देशभरात 89,35,354 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

गेल्या 24 तासांत 24,770 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,31,75,656 झाली आहे. सध्या, भारतातील रोगमुक्ती दर 97.94 टक्के आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे. केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, गेले सलग 101 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50 हजारांहून कमी असण्याचा कल कायम आहे.

गेल्या 24 तासांत, 18,833 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 2,46,687 इतकी आहे आणि ही गेल्या 203 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.73 टक्के आहे. देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 14,09,825 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 57 कोटी 68 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.68% असून गेले 103 दिवस हा दर 3 टक्क्यांहून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 1.34 टक्के आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 37 दिवस 3टक्क्यांहून कमी आहे आणि आता गेले सलग 120 दिवस हा दर 5 टक्क्यांहून कमी राहिला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये/ केन्द्र शासित प्रदेशांना आपल्या सर्व स्त्रोताद्वारे 92.57 कोटींपेक्षा जास्त (92,57,51,325)लसींच्या मात्रा (विनामूल्य) आणि थेट खरेदी याद्वारे पुरवल्या आहेत. याशिवाय लसीच्या 6.93 कोटी पेक्षा जास्त (6,93,46,080 ) शिल्लक आणि न वापरलेल्या अशा मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश आणि खाजगी रुग्णालयांकडे अद्यापही उपलब्ध आहेत. देशव्यापी लसीकरण अभियानाचा भाग म्हणून केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा पुरवत आहे. कोविड-19 लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातल्या लस उत्पादकांकडून उत्पादित 75 टक्के लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवत आहे.