एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

मुंबईमनसुख हिरण हत्या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने (NIA) अटक केली आहे. शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली.एनआयएच्या ताब्यातील सचिन  वाझे आणि संतोष शेलार यांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांचं नाव आल्याने एनआयएने अटकेची कारवाई केली आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप शर्मा यांच्यावर आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्याही कार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात एनआयएनं सविस्तर तपास केल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यामध्ये सचिन वाझे यांच्यासह मुंबई पोलिसातील दोन कर्मचारी आणि एक बुकी यांचा हात असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानुसार त्यांना एनआयएनं अटक केली. त्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात झालेली ही मोठी कारवाई ठरली आहे.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा हे 1983 साली पोलीस सेवेत रुजू झाले होते. पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख आहे. प्रदीप शर्मा यांनी 312 गुंडांचा एन्काऊंट केला आहे. कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. शर्मा यांना 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. 2017 मध्ये आरोपांतून क्लीनचिट मिळाली. 2017 साली त्यांनी दाऊदच्या भावाला अटक केली होती. त्यांनी 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला. नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात आतापर्यंत प्रदीप शर्मा यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस दलातून निलंबित झालेले सचिन वाझे, रियाज काझी, सुनील माने यांच्यासह विनायक शिंदे, संतोष शेलार, आनंद यादव यांचा समावेश आहे.