आण्विक क्षेपणास्त्रांचा वेध घेणारं ‘INS ध्रुव’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

आण्विक क्षेपणास्त्रांचा वेध घेणारं ‘INS ध्रुव’ नौदलाच्या ताफ्यात होणार दाखल

शत्रूपक्षाच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा क्षणार्धात माग काढणारं जहाज लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्याचं नाव आहे आयएनएस ध्रुव (INS Dhruv). आयएनएस ध्रुव हे शत्रूच्या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारं भारताचं पहिलं जहाज आहे. जे जहाज १० सप्टेंबर रोजी लॉंच केलं जाईल. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल १० सप्टेंबर रोजी विशाखापट्टणममध्ये उपग्रह आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणारं भारताचं पहिलं जहाज आयएनएस ध्रुव सेवेत दाखल होणार असल्याचे वृत्त आहे.

हिंदुस्तान शिपयार्डने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (NTRO) यांच्या सहकार्याने निर्मिती करण्यात आलेल्या आयएनएस ध्रुवमध्ये शत्रूच्या टेहळणी उपग्रह आणि अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्याची क्षमता आहे. आयएनएस ध्रुवच्या लॉंच दरम्यान नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह आणि एनटीआरओचे अध्यक्ष अनिल दासमानासह डीआरडीओ आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती मिळत आहे. हे जहाज भारतीय नौदलाच्या जवानांसह स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (एसएफसी) द्वारे नियंत्रित केले जाईल. आतापर्यंत अशी जहाजं फक्त फ्रान्स, अमेरिका, इंग्लंड, रशिया आणि चीनद्वारे चालवली गेली आहे. आता या यादीत भारताचा देखील समावेश झाला आहे.

भारताचं सागरी क्षेत्र होणार अधिक सुरक्षित

१०,००० टन वजनाचे हे जहाज भारतीय शहरे आणि लष्करी तळांजवळ येणाऱ्या शत्रूच्या क्षेपणास्त्रांबाबत लवकर चेतावणी देणारी यंत्रणा म्हणून काम करेल आणि ते त्या हल्ल्याचा प्रतिकार करेल. त्यात या हल्ल्यांना अयशस्वी करण्याची क्षमता आहे. एवढंच नव्हे तर हे जहाज हिंदी महासागरातील भारताचं सागरी क्षेत्र अधिक सुरक्षित करेल आणि शत्रूंपासून सतर्क राहील. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती अशा वेळी लाँच केली जात आहे जेव्हा जगभर पाण्याखालून सशस्त्र आणि पाळत ठेवणाऱ्या ड्रोनचे युग सुरू झाले आहे.

चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. भारतासोबत असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आयएनएस ध्रुवचं महत्त्व आणखी वाढतं. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताच्या सागरी सुरक्षा जाळ्यासाठी आयएनएस ध्रुव हे मोठी ताकद ठरेल. आयएनएस ध्रुव डीआरडीओने विकसित केलेले अत्याधुनिक अॅक्टिव्ह स्कॅन अॅरे रडार किंवा एईएसएने सुसज्ज आहे. जे आजच्या जगात खूप प्रगत मानलं जातं.