…अन्यथा रस्त्यावर उतरु; नितेश राणेंचा मु्ख्यमंत्र्यांना पत्र लिहून इशारा

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

…अन्यथा रस्त्यावर उतरु; नितेश राणेंचा मु्ख्यमंत्र्यांना पत्र लिहून इशारा

भाजपाचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची तक्रार केली आहे. शहरामधील दोन प्रमुख क्रीडा संकुलांचं खासगीकरण करण्याचा घाट महापौरांच्या निटवर्तीय अधिकाऱ्याने घातल्याचा आरोप या पत्रामधून नितेश राणेंनी केलाय. तसेच हे खासगीकरण थांबवण्यात यावे नाहीतर आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय.

मुलुंडमधील ललित कला प्रतिष्ठान आणि अंधेरीमदील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाच्या खासगीकरणाला नितेश राणेंनी विरोध केलाय. यासंदर्भात एक पत्रच नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. पत्रामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करण्यात आला असून त्यांनीच मुंबईकरांना जलतरण आणि बाग यासारख्या सेवा मिळाव्यात म्हणून या सोयी उपलब्ध करुन दिल्या होत्या असं म्हटलं आहे. बाळासाहेबांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच मराठी माणूस होता. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्याच उद्देशाने सर्वसामान्यांना जलतरण तलाव, बाग यासारख्या सोयी मिळाव्यात म्हणून मुंबई कला प्रतिष्ठानची स्थापना केलेली. मात्र बाळासाहेबांनी स्थापन केलेलं हे प्रतिष्ठान आता भ्रष्टाचाराचं केंद्र झालंय असा संताप सामन्य नागरिकांमध्ये व्यक्त होत असल्याचा उल्लेख पत्रात आहे.

तसेच या पत्रामध्ये पुढे नितेश राणे यांनी भ्रष्टाचाराचेही आरोप केलेत. या दोन्ही क्रीडा संकुलांचा कारभार हा पारदर्शक नसल्याचा आरोप नितेश राणेंनी पत्रातून केलाय. असं असतानाच महापौरांचे निकटवर्तीय अधिकारी असणाऱ्या देवेंद्रकुमार जैन यांच्या हस्तक्षेपाने या दोन्ही क्रीडा संकुलांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. ही खासगीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात यावी अशी मागणी नितेश राणेंनी पत्रातून केली. हे खासगीकरण झाल्यास या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल अशी भीती पत्रात व्यक्त करण्यात आलीय. या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास त्यांना घेऊन आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन असंही नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच पत्रामध्ये या क्रीडा संकुलांमधील जलतरणतलाव नफ्यामध्ये असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. हे जलतरणतलाव नफ्यात असतानाच त्याचं खासगीकरण करण्याची काय गरज आहे असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केलाय. नफ्यात चालणाऱ्या तरणतलावाचे खासगीकरण कशासाठी आणि कुणासाठी केलं जात आहे असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केलाय.