अभिनेता अक्षय वाघमारेचं पहिलं रोमॅण्टिक गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

अभिनेता अक्षय वाघमारेचं पहिलं रोमॅण्टिक गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘बिग बॉस मराठी ३’च्या घरातमध्ये अभिनेता अक्षय वाघमारेचा परफॉर्मन्स पाहणं प्रेक्षकांना आवडत आहे. अक्षयने आतापर्यंतच्या सर्वच टास्कमध्ये चांगली टक्कर दिली आहे. एकीकडे अक्षय ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये सहभागी झाला असला तरी लवकरच अक्षय वाघमारेचं एक नवं रोमॅण्टिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘हळवेसे’ असं या गाण्याचे नाव असून हे गाणं जीवन मराठे व निकिता पुरंदरे यांनी स्वरबद्ध केलं आहे. मुळशी इथं चित्रीकरण करण्यात आलेल्या या गाण्यात सानिया निकम ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. हळवेसे गाण्यात काम करण्याच्या अनुभवाविषयी अक्षय सांगतो, की ‘या गाण्याची सर्व टीम उत्साही असल्याकारणाने हे गाणे करताना खूप मजा आली. हे माझे पहिलेच रोमॅण्टिक गाणे असल्याने या गाण्याबद्दल मला कमालीची उत्सुकता आहे.’

हळवेसे’ या गाण्यासाठी नायक म्हणून अक्षय वाघमारे यांचेच नाव डोक्यात होते. मात्र नायिका सानिया निकम हिचे ‘मन हे वेडे’ गीताचे इंस्टाग्रामवर रील पाहून तिची या गाण्यासाठी निवड करण्यात आल्याचेही निर्माते श्रीनिवास यांनी सांगितले.

अक्षय संत, देवश्री आठल्ये व जीवन मराठे यांनी लिहिलेल्या गीताला स्वप्नील सावंत व जीवन मराठे यांनी संगीतबद्ध केले आहे. साहिल सहा यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून श्रीनिवास कुलकर्णी व मधुसूदन कुलकर्णी हे या गाण्याचे निर्माते आहेत.