मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणी एकाला बारामतीतून अटक

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईतील बोगस लसीकरण प्रकरणी एकाला बारामतीतून अटक

मुंबई : मुंबईमध्ये आतापर्यंत नऊ ठिकाणी बनावट लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते आणि या बनावट लसीकरण शिबिरांद्वारे २,०५३ लोकांची फसवणूक झाली, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली होती. दरम्यान, या प्रकरणी मुंबईतील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात कर्मचारी असलेला राजेश पांडे याला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणात १२ जणांना अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

कांदिवली इथल्या हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातल्या नागिरकांनी बोगस लसीकरणाबद्दलची तक्रार केली होती. इथे आयोजित लसीकरण शिबिरात प्रतिडोस १२६० रुपये आकारले जात होते. या प्रकरणात आता मुंबई शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करणाऱ्या या टोळीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून एका पत्रकाद्वारे या कारवाईबद्दलची माहिती देण्यात आली आहे. यापुर्वी गुन्ह्यामध्ये सहभागी आरोपींनी लसींचा पुरवठा करण्यासाठी वापरलेलं वाहन क्रीम रंगाची टोयोटा कोराला ही कार जप्त करण्यात आली आहे. तसंच गुन्ह्यातले मुख्य आरोपी महेंद्र प्रताप सिंह आणि मनीष त्रिपाठी यांची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

गुन्ह्यासाठी वापरल्या गेलेल्या लसींचा पुरवठा चारकोपच्या शिवम हॉस्पिटलमधून होत असल्याने या हॉस्पिटलचे डॉ. शिवराम पटारिया आणि निता पटारिया यांनाही अटक करण्यात आली आहे.