दिवाळीनंतर शाळा नियमितपणे सुरु होणार?
For Printing Download Epaper from files section from bottom of this page
करोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षाहून अधिक कालावधीसाठी बंद असलेल्या राज्यातील शाळा आता लवकरच पुन्हा सुरु होणार असल्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर शाळा नियमितपणे सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गणेशोत्सवानंतरच्या 20 दिवसांमधली राज्यातील करोनास्थिती पाहून तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन शाळांबाबतचा निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याच्या कोविड टास्क फोर्सने दिल्या आहेत. दरम्यान, नियमितपणे शाळा सुरु करण्याच्या या निर्णयासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शाळा सुरु करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतर राज्यात जी स्थिती असेल त्यावर अवलंबून आहे”, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, गेल्या वर्षी देखील राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेतला पण मुंबईत तशी स्थिती नव्हती. त्यामुळे, शाळा सुरु करण्याचा निर्णय हा दिवाळीनंतर जी स्थिती असेल त्यावर अवलंबून आहे. आजही लहान मुलांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे, हा निर्णय ही खूप मोठी रिस्क असेल. त्याचप्रमाणे, 80 ते 90 टक्के पालकवर्गाचं असं म्हणणं आहे की इतकी मोठी रिस्क आम्ही घेणार नाही. म्हणूनच, त्यावेळची स्थिती जशी असेल त्यावरून महानगरपालिका शहरातील शाळा सुरु करण्याबाबतचा विचार करेल.” त्यामुळे, निश्चितच दिवाळीनंतर करोना नियंत्रणात असेल तर नियमित शाळा सुरु करण्यास कोणतीही हरकत नसेल असं सांगण्यात येत आहे. राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात राहिल्यास शाळा सुरु करण्यास कोविड टास्क फोर्स सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे, मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग देखील या दृष्टीने आता तयारीला लागल्याचं दिसून येत आहे. मात्र, यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झाल्यास आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याची तयारी शाळांनी दाखवल्यास शाळा नियमित सुरु कराव्यात असं मत देखील राज्याच्या कोविड टास्क फोर्सने मांडलं आहे. त्याचप्रमाणे, मुंबई मनपाच्या शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्यांची यादी मागवली आहे.