शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर, : शेकापचे ज्येष्ठ नेते आणि सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. गणपतराव देशमुख यांना काही दिवसांपूर्वी पित्ताशयाच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले होते. पण उपचारादरम्यान अखेर त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज दुपारी सांगोल्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
11 वेळा आमदार होण्याचा विक्रम केलेले गणपतराव देशमुख संपूर्ण महाराष्ट्रात आबासाहेब म्हणून परिचित होते. विधानसभेत एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम त्यांनी मोडला होता. त्यांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. देशमुख यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील एक राजकीय नेतृत्व हरपल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे 10 ऑगस्ट 1926 रोजी एका शेतकरी कुटुंबात देशमुख यांचा जन्म झाला. पण वकिली व्यवसायामुळे ते सांगोला येथे स्थायिक झाले. त्यावेळी सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी झोकून दिले होते. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर १९९५ सालचा अपवाद वगळता ते २०१९ पर्यंत म्हणजे तब्बल ५२ वर्षे आमदार राहिले. ते राज्याचे कृषी ग्रामविकास न्याय पणन, रोजगार हमी या खात्यांचे मंत्री होते. तसंच 2009 साली त्यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.