महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

पुणे, : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा पुढील काही तासांत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.. राज्यात सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, मुंबई, ठाणे, पालघर, चंद्रपूर, भंडारा, गोदिया आणि गडचिरोली हे 10 जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने आज पुण्यासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येलो-अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

पुढील पाच दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. तर विकेंडनंतर राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारीही राज्यात हीच परिस्थिती कायम राहणार असून औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मंगळवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेलं हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 3-4 तासात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील चोवीस तासांत हे वादळ ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.

हिंदुस्थान समाचार