रायगड येथे उभारणार बल्क ड्रग पार्क स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावे - मुख्यमंत्री

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रायगड येथे उभारणार बल्क ड्रग पार्क स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावे - मुख्यमंत्री

मुंबई : देशातील औषधांच्या पुरवठ्याची क्षमता असलेला राज्यातील महत्वाकांक्षी रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्कची उभारणी करतांना स्थानिकांना विश्वासात घेऊन काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

            रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि रोहा या तालुक्यातील 17 गावांच्या जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. कोणत्याही गावाचे स्थलांतर होणार नाही. स्थानिकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणारा 30000 कोटींच्या गुंतवणूकीचा आणि अंदाजे 75000 लोकांना रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प असणार आहे. यासंदर्भातील सादरिकरण उद्योगविभागातर्फे गुरुवारी मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले.

     या वेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री कु.अदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव बलदेव सिंग, एम आय डी सी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन, रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांचेसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

     मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, याठिकाणी उभारल्या जाणा-या प्रकल्पांमध्ये भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा. या रोजगारासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी.  प्रत्यक्ष जमीनीवरचे सर्वेक्षण व्हावे, शक्य असेल तिथे बागायतीचे संरक्षण व्हावे आणि स्थानिकांना सर्वोत्तम मोबदला मिळेल यासाठीचा सर्वंकष आराखडा तयार करून स्थानिकांशी चर्चा करून या प्रकल्पाची आखणी करावी असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.