रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीने दाणादाण, अनेक रस्ते, कोकण रेल्वे वाहतूक बंद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीने दाणादाण, अनेक रस्ते, कोकण रेल्वे वाहतूक बंद

रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. अनेक रस्त्यांवरची वाहतूक पुरामुळे बंद आहे. चिपळूणपासून दक्षिणेकडे रत्नागिरीच्या दिशेने जाणारी कोकण रेल्वेची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील खेड, चिपळूण, रत्नागिरी, लांजा आणि राजापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे.  ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळे चिपळूण शहर जलमय झाले आहे. वाशिष्ठी आणि शिव या दोन नद्यांना पूर आल्यामुळे चिपळूण शहरात अनेक भागात पाणी साचले आहे. अंतर्गत मार्ग बंद झाले आहेत. एसटी बसस्थानकाच्या परिसरात बारा फुटाहून अधिक पाणी आहे. अनेक इमारतींचे मजले पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पाच हजाराहून अधिक लोक अडकून पडले आहेत. अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. या पुरामुळे सोळा वर्षांपूर्वी २००५ साली आलेल्या महापुराची आठवण अनेकांना झाली. ती स्थिती निर्माण होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. चिपळूण शहरातील बाजारपेठ तसेच खेर्डी परिसरात पाच फुटांपेक्षा अधिक पाणी शिरले आहे. शहरातील दोन्ही प्रमुख बाजारपेठा पाण्याखाली आहेत. शेकडो घरेही पाण्याखाली गेली आहेत. चिपळूणमध्ये २६ जुलै २००५ रोजी ढगफुटी झाली होती. तेव्हा चिपळूण शहर आणि खेर्डी बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. तशीच स्थिती आज आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वाशिष्ठी नदीला पूर आल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. कोकण रेल्वेने चिपळूणपासून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या गाड्या असतील त्या स्थानकांमध्ये थांबवल्या आहेत. आठ गाड्या सध्या विविध स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत.



चिपळून-कराड रस्त्यावरील वाहतूक खेर्डी येथे पाणी साचल्यामुळे बंद झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील ब्रिटिशकालीन बहादूर शेख नाक्यावरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अनेक घरांमध्ये छपरापर्यंत पाणी आल्याने लोक पाण्यात अडकले आहेत. पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत असून शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बसस्थानक, चिंचनाका, मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, नवीन बसस्थानक, भोगाळे, परशुराम नगर परिसरात पाणी वाढत आहे.
जगबुडी नदीला पूर आल्यामुळे खेड शहरात पुराचे पाणी साठले आहे. खेड ते दापोली दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे. राजापूर तालुक्यात अर्जुना नदीची पाण्याची पातळी वाढली असून राजापूर शहरात जवाहर चौकात पाच फुटांहून अधिक पाणी आहे.  संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांना जोडणाऱ्या बावनदी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. संगमेश्वर तालुक्यात कासे पुलावर पाणी भरल्याने वाहतूक बंद आहे. बावनदीचे पाणी निवे खुर्द येथे रस्त्यावर आल्याने तो रस्ताही बंद आहे. धामणी येथे पुराचे पाणी भरल्यामुळे अनेक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. वांद्री येथे विजेचे खांब रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक बंद आहे.
रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेत काजळी नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. रत्नागिरीतून सोमेश्वर, तोणदे, चिंचखरीकडे जाणारा मार्ग सोमेश्वरमध्ये पुराचे पाणी भरल्यामुळे बंद आहे. टेंभ्ये येथील आशा प्रदीप पवार ही ५४ वर्षांची महिला करोनाप्रतिबंधक लसीकरणासाठी जात होती. पण ती पुराच्या पाण्यात वाहून गेली.  लांजा तालुक्यात इसवली येथे दोन घरांवर आंब्याचे झाड कोसळल्याने नुकसान झाले. आंजणारी येथील पुलाला लागून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. भांबेड येथे पुराचे पाणी शेतात शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वाटूळ ते दाभोळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे त्या रस्त्याची वाहतूकही बंद आहे. खोरनिनको येथील दोन वाड्या जोडणारा लोखंडी साकव पुराच्या पाण्यामुळे धोकादायक झाला असल्यामुळे त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.