राणेंच्या अटकेचे सावंतवाडीत तीव्र पडसाद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राणेंच्या अटकेचे सावंतवाडीत तीव्र पडसाद

सिंधुदुर्ग,: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर सिंधुदुर्गात भाजप आक्रमक झाली. सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडी सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी संगमेश्वर येथे जनसंपर्क यात्रेदरम्यान ताब्यात घेण्यात आले. यानंतर शिवसेना भाजप असा वाद पेटला असून संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारे आंदोलन सुरू झाले आहे. भाजपकडून राणे यांच्या अटके विरोधात निषेध आंदोलन सुरू असून सावंतवाडीत नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. येथील माजी खासदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजपा कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले. नारायण राणे अंगावर हे, बाकी सब भंगार है.., उद्धव ठाकरे चोर है अशा घोषणा देत निषेध करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, सत्तेच्या जोरावर कायद्याच्या बाहेर जाऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक चुकीची असून शिवसेनेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. ईट का जबाब पत्थर से दिला जाईल, आज रस्त्यावर उतरलो उद्या काय करु हे सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांनी त्यांनी आपली पातळी ओळखून वागावे.
या आंदोलनामध्ये भाजप शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरपालिका आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर नगरसेवक मनोज नाईक, नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, दिपाली भालेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.