राज्याला शैक्षणिकदृष्ट्‌या अग्रेसर ठेवणार - उद्धव ठाकरे

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्याला शैक्षणिकदृष्ट्‌या अग्रेसर ठेवणार - उद्धव ठाकरे

मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या कार्यबल गटाच्या शिफारशी आणि सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

शैक्षणिकदृष्ट्‌या राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि या क्षेत्रात राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी कार्यबल गटाच्या शिफारशीनुसार सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. कार्यबल गटाने तयार केलेल्या अहवालाबाबत आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी माहिती देण्यात आली. यावेळी समिती सदस्यांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांना अहवालाची प्रत सुपूर्द करण्यात आली.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने कार्यबल गटाने केलेल्या कामकाजाची आणि राज्य शासनास करण्यात आलेल्या विविध शिफारशींची डॉ. माशेलकर यांनी यावेळी माहिती दिली. शिफारशीनुसार तातडीने हाती घ्यावयाच्या उपाययोजना आदींसंदर्भात लवकरच मंत्रिमंडळात सादर करुन त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

हा विषय अत्यंत महत्वाचा आणि भविष्य घडविणारा आहे. करोनापश्‍चात जगामध्ये शिक्षण हा अत्यंत महत्वाचा भाग असणार आहे. शिक्षणानंतर रोजीरोटी देणेही तितकेच महत्वाचे आहे. बदलत्या काळात डिजिटल शिक्षण महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर त्यासाठीच्या आवश्‍यक पायाभूत सुविधांची निर्मिती करणेही गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दप्तराचे ओझे कमी करणार
मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करणेही गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार डिजिटल शिक्षण, इंग्रजी, जर्मन अशा विविध भाषांचे शिक्षण हेही आवश्‍यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीसाठी कार्यबल गटाने योग्य वेळी आपला अहवाल राज्य शासनास सादर केला आहे. त्यातील सूचनांची लवकरात लवकर अंमलबजावणी करुन महाराष्ट्राला शैक्षणिकदृष्ट्‌या प्रगतीपथावर ठेवण्यासाठी सर्व त्या उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.