राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे,नाना पटोलेंच्या समावेशाची शक्यता ?

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचे वारे,नाना पटोलेंच्या समावेशाची शक्यता ?

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुरू झाल्या असून,या पार्श्वभूमीवर नाना पटोले सध्या दिल्लीत ठाण मांडून आहेत.पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदिल मिळताच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्या निमित्ताने राज्यात फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.याच बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याच्या दोन जागांही भरण्यात येणार असल्याचे समजते.
आक्रमक आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपशी दोन हात करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या दिल्लीत असून,त्यांनी नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे.त्यानंतर त्यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला प्रभारी एच.के.पाटील उपस्थित होते.यावेळी नाना पटोले यांच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबतही चर्चा झाली असल्याचे समजते.त्यामुळे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना डच्चू देण्यात येवून त्यांच्या जागी नाना पटोले यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.नितीन राऊत यांच्याकडे असलेल्या उर्जा खात्यावर पटोले यांची नजर असली तरी सध्या तरी राऊत यांच्याकडे असणारे उर्जा खाते बदलण्याच्या शक्यता नसल्याने पटोले यांच्यावर आदिवासी विकास खात्याची जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राठोड आणि सचिन वाझे प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा रिकामी असल्याने राज्याच्या मंत्रिमंडळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागा भरून काँग्रेसकडून नाना पटोले यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कोट्यातून भरण्यात येणा-या प्रत्येकी एका जागेसाठी अनेक इच्छूक असून,मंत्रिपद मिळावे म्हणून आत्तापासून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.राष्ट्रवादीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे एका मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत तर शिवसेनेकडून नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेणारे भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा आहे.मात्र शिवसेनाच्या कोट्यातील एका जागेसाठी विदर्भातील अनेक नेते इच्छूक आहेत