एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार; आदित्य ठाकरे यांचं सूतोवाच

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार; आदित्य ठाकरे यांचं सूतोवाच

मुंबईएमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यामुळे राज्य सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी एमपीएससीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सूतोवाच केलं आहे. आदित्य ठाकरेंनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे सूतोवाच केलं. मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात या सर्वच विषयांवर चर्चा होणार आहे, असं सांगत मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमपीएससीवरही चर्चा होणार असल्याचे संकेत आदित्य यांनी दिले.

झेव्हियर्सच्या मैदानाचं काम होत आलं आहे. त्यामुळे आता 90 मिली पाऊस पडला तरी पाणी भरणार नाही. पाऊस पडल्यावर काम थांबवावं लागत आहे. अधिक क्षमतेच्या होल्डिंग टँक असाव्यात. मुंबईत पाणी तुंबणारच नाही असं म्हणता येणार नाही. पाऊस क्षमतेच्या बाहेर पडतो तेव्हा पाणी तुंबतं, असं ते म्हणाले.

आत्महत्या नव्हे खूनच

स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येवरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला घेरलं आहे. स्वप्नील लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेला खून आहे. स्वप्नीलप्रमाणेच इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची सरकार वाट पाहत आहे का?, असा सवाल पडळकर यांनी केला. येत्या आठ दिवसात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा देतानाच सरकारने एमपीएससीच्या विद्यार्थांना तातडीने नियुक्ती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

एमपीएससीकडे दुर्लक्ष करू नका

एमपीएससीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी एमपीएससीवरही तोफ डागली आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करु द्यायला हवं. परीक्षा पास झाल्यानंतर दोन दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, असंही ते म्हणाले.