महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार; अजित पवारांची घोषणा स्वप्निल लोणकर आत्महत्येचे विधानसभेत तीव्र पडसाद

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार; अजित पवारांची घोषणा स्वप्निल लोणकर आत्महत्येचे विधानसभेत तीव्र पडसाद

मुंबई  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याकारणाने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.त्याचे तीव्र पडसाद आज विधानसभेत उमटले.स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.तर या मुद्द्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,सरकार येत्या ३१ जुलैपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व रिक्त जागा भरेल.यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही,अशी घोषणा सभागृहात केली.पवार यांच्या घोषणेमुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आज सुरू झाले.कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे ज्येष्ठनेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुण्यातील तरूण स्वप्निल लोणकर याने केलेल्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. आक्रमक झालेल्या फडणवीस यांनी या मुद्द्यावर सरकारला चांगलेच धारेवर धरले तर मुनगंटीवार यांनी स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी केली.यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण  झालेल्या स्वप्निल लोणकर या उमेदवाराच्या आत्महत्या ही वेदनादायी असून,अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू नये,अशी सरकारची भूमिका आहे.काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यामुद्द्यावर सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली.२०१९ मध्ये स्वप्निल लोणकर याने राज्य अभियांत्रिकीची पूर्व परीक्षा दिली होती.याची मुख्य परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी झाली आणि या परीक्षेचा निकाल २८ जुलै २०२० रोजी लागला. या मध्ये एकूण हजार ६७१ उमेदवार पात्र ठरले. एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागल्याने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती होऊ शकल्या नाहीत असे पवार यांनी सभागृहात सांगितले.

याच दरम्यान राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला  स्वायत्तता असल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्या.यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला.यामुद्द्यावरून राज्यातील तरूणांनी आंदोलने केली होती अशी माहिती पवार यांनी देवून,स्वप्निल लोणकरने असे करायला नको होते,काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.अनेक मंत्र्यांनी यावर आपली भूमिका मांडली. सरकारने ही गोष्ट गांभिर्याने घेतली असून,सरकार येत्या ३१ जुलै पर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संपूर्ण रिक्त जागा भरेल. यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही,अशी घोषणा सभागृहात उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला स्वायतत्ता असली,तरी रिक्त जागा भरताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना बोलावून तरूणांच्या  मनात निर्माण झालेली भावना दूर करण्यासाठी चर्चा करण्यात येईल.मुख्यमंत्री ठाकरे हे सर्व भरती तातडीने करण्याच्या संदर्भात आग्रही आहे.मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश दिले असल्याने त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असे सांगतानाच, लोणकर कुटुंबियांच्या दुःखात सरकार आणि विरोधक सहभागी आहोत.राज्यात पुन्हा अशी घटना घडणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी सभागृहाला दिली.