मुंबईत आणखी सुविधा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

मुंबईत आणखी सुविधा केंद्र उभारण्यासाठी प्रयत्नशील

मुंबई : गरजू नागरिकांसाठी सुविधा समुदाय केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून त्यातून स्वच्छ व आरोग्यदायी पद्धतीने शौचालय, स्नानगृह, पिण्याचे शुद्ध पाणी, यांत्रिकी कपडे धुलाई या सोयी उपलब्ध होत आहेत. मुंबई महानगरात आवश्यक त्या भागांमध्ये आणखी सुविधा समुदाय केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धारावीत 111 शौचकूप असलेले सुविधा केंद्र उभारणी सुरु आहे, असे उद्गार राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.
घाटकोपर (पश्चिम) मधील जगदुशा नगर येथे सार्वजनिक-खासगी सहभागातून निर्मित, पर्यावरणस्नेही असे दुमजली सुविधा समुदाय केंद्र उभारण्यात आले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली या केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेसह हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी तसेच हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एचएसबीसी इंडिया) यांच्या संयुक्त भागीदारीतून सुविधा केंद्र प्रकल्प साकारला आहे.
मुंबईमध्ये एकूण 6 सुविधा समुदाय केंद्र उभारण्याचा संयुक्त प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेसह हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी आणि एचएसबीसी इंडिया यांच्या संयुक्त प्रयत्नाने हाती घेण्यात आला आहे. घाटकोपर (पश्चिम) मधील आझाद नगरामध्ये सर्वप्रथम 19 नोव्हेंब 2016 रोजी पहिल्या सुविधा केंद्राचे लोकार्पण झाले. त्यानंतर मालाड-मालवणी येथे 29 जुलै 2019, अंधेरीमध्ये 19 नोव्हेंबर 2019, गोवंडीत 15 ऑगस्ट 2020 तर कुर्ला येथे 26 जानेवारी 2021 रोजी या क्रमाने मुंबईतील सुविधा केंद्र कार्यान्वित झाली आहेत. आता धारावीमध्ये अतिरिक्त केंद्र बांधले जात आहे.

प्रामुख्याने समाजातील गरजू घटकांना स्वच्छ, सुरक्षित व दुर्गंधी मुक्त अशी प्रसाधनगृह उपलब्ध व्हावीत, त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, कपडे धुण्याची सेवा मिळावी, या दृष्टीकोनातून सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. चांगली शौचालये आणि शुद्ध पिण्याचे पाणी नसल्यास त्यातून आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे समाजातील गरजू घटकांसह महिला, पुरुष, लहान मुले आणि दिव्यांग व्यक्ती यांना त्यांच्या गरजेनुसार चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न या केंद्रांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यापूर्वीच्या 5 केंद्रांमध्ये स्नानगृह, हात धुणे, यांत्रिकी पद्धतीने कपडे धुणे इत्यादी सोयींमधून निघणा-या सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन पुनर्वापरावर भर देण्यात आला. या सर्व5५ सुविधा केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत तब्बल ३५ दशलक्ष लीटर पाण्याची बचत करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रामध्ये वार्षिक सुमारे20हजार याप्रमाणे ५ केंद्रांमध्ये मिळून सुमारे १ लाख नागरिक सदर सुविधांचा लाभ घेतात. अत्यंत वाजवी, सर्वसामान्यांना परवडतील असे दर या सेवांसाठी आकारले जातात. तसेच केंद्रांचे दैनंदिन व्यवस्थापन करताना समाजातील विविध घटकांना देखील सहभागी करुन घेतले जाते. सुविधा केंद्र उभारणी प्रकल्पाला युनायटेड वे मुंबई आणि प्रथा सामाजिक संस्था यांचेदेखील पाठबळ लाभले आहे.
घाटकोपरमध्ये आज लोकार्पण केलेल्या दुमजली सुविधा समुदाय केंद्रामध्ये स्नानगृह, हात धुणे, कपडे धुणे इत्यादीसह शौचालयातील पाण्यावर देखील पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. शौचालयातील पाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन शौचालयातच पुनर्वापरासाठी उपलब्ध करुन देणारे हे मुंबईतील पहिलेच केंद्र आहे. या केंद्रामध्ये एकूण ३८ शौचकुपे आहेत. त्यासोबत पिण्याचे शुद्ध पाणी, स्नानगृह, प्रसाधनगृह तसेच यांत्रिकी पद्धतीने कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. वर्षभरामध्ये सुमारे १० दशलक्ष लीटर पाण्याची बचत करण्याच्या दृष्टीने या केंद्रातच पाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. दरवर्षी सुमारे २० हजार नागरिक या केंद्रातील सुविधेचा वापर करतील, असा अंदाज आहे.
लोकार्पण निमित्ताने संदेश देताना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, सुविधा केंद्रांची ही संकल्पना समाजातील गरजू घटकांच्या कल्याणासाठी सार्वजनिक-खासगी सहभागातून केलेल्या प्रयत्नांचे उत्तम उदाहरण आहे. नागरी वसाहतींमधील सामुदायिक आरोग्य आणि स्वच्छतेसाठी घेतलेला हा पुढाकार भारतातीलच नव्हे तर जगातील इतर शहरांसाठी देखील अनुकरणीय आहे. या केंद्रांसाठी हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एचएसबीसी इंडिया यांनी केलेल्या सहकार्याबद्दल चहल यांनी आभारही मानले आहेत.