करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

For Printing Download Epaper from files section from bottom of this page

करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : करोनावरील उपचारांमध्ये महत्वाची मानल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसंदर्भात केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून करोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता. दरम्यान केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.

आतापर्यंत करोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. दरम्यान टास्क फोर्सने आता प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळलं आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, एम्स दिल्ली आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर करोना उपचारासंबंधी नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा थेरपी करोनाविरोधातील उपचारपद्धतीत परिणामकारक असल्याचं सांगण्यात आलं होतं. यासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठीही आवाहन केलं जात होतं. मात्र अभ्यासातून प्लाझ्मा थेरपी परिमाणकारक नसल्याचं समोर आलं आहे.

गेल्या शुक्रवारी आयसीएमआर, टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळण्याच्या बाजूने मत नोंदवलं होतं. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तसंच काही संशोधकांनी प्लाझ्मा उपचार पद्धतीच्या अतार्किक वापरावर प्रश्न उपस्थित केले होते. केंद्रीय वैद्यकीय सल्लागार डॉ. विजय राघवन यांच्यासह भारतीय वैद्यकीय आयसीएमआर आणि दिल्लीतील एम्स संचालकांना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आलं होतं.